सिनेमा : जय हो
दिग्दर्शक : सोहेल खान
कलाकार : सलमान खान, डेझी शाह, तब्बू, सना खान, नादिरा बब्बर
संगीत : साजिद-वाजिद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खानचा `जय हो` हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकलाय. अॅक्शनसोबतच या सिनेमात प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या आवश्यक समजला जाणारा प्रत्येक मसाला भरलाय. `जय हो` २००६ साली आलेल्या तेलगु सिनेमा `स्टालिन`चा रिमेक आहे. हिंदी रुपांतरणात मात्र या सिनेमाच्या पटकथेत काही बदल करण्यात आलेत.
सलमान नावाचं खणखणीत नाणं पुन्हा एकदा चाललंय असं म्हणायला हरकत नाही. अॅक्शन आणि अॅक्टींगच्या बाबतीत सलमाननं स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलंय. एका `आम आदमी` आणि राजनेत्यामध्ये सुरू असलेलं युद्ध सिनेमात चांगल्या पद्धतीनं चित्रीत करण्यात आलंय. या निमित्ताने दमदार अॅक्शन या सिनेमात पाहायला मिळते. संपूर्ण सिनेमात सलमान खान केंद्रस्थानी दिसतो. एकूणच काय तर हा सिनेमा म्हणजे एन्टरटेन्मेंटचा फुलडोस आहे. आणि त्यात जर तुम्ही सलमानचे फॅन असाल तर हा सिनेमा पाहून तुम्ही नक्कीच निराश होणार नाही. संपूर्ण सिनेमात सलमान आणि त्याचे डायलॉग भाव खाऊन जातात.
सलमानच्या सिनेमांकडून प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे, हे सलमान आणि सोहेलच्या आता चांगलंच लक्षात आलंय. त्यामुळेच स्क्रिप्ट आणि मसाला तोच ठेवला गेलाय जो सलमानच्या अलीकडच्या इतर सिनेमांत दिसला होता. सलमाननं या सिनेमात शानदार अभिनय केलाय. मग, तो रोमान्स सीन असो किंवा अॅक्शन.. सलमाननं आपण आजही चलतीत असलेलं नाणं असल्याचं दाखवून दिलंय. सिनेमात सलमान आणि डेझी शाहचा रोमान्सचा तडकाही चांगलाच बसलाय.
काय आहे सिनेमाचं कथानक...
सिनेमाची कथा आहे एका `आम आदमी`ची... सेनेचा माजी अधिकारी असलेल्या जय अग्निहोत्री (सलमान खान) याची ही कहाणी... भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, जय आपलं प्रथम कर्तव्य मानतो. गरजवंतांची मदत करणं हा त्याचा धर्म... जय पहिल्यांदा लोकांची मदत करतो आणि नंतर त्याच लोकांना इतर गरजवंतांची मदत करण्याचं आवाहनही करताना दिसतो. यातच, सलमानची भेट होते एका राजनेत्याशी (डॅनी डेनजोंगपा)... आणि मग सिनेमाची कथा पुढे सरकते... आणि मग सुरु होतो राजनेत्याचा आणि आम आदमीचा संघर्ष..
परंतु, जयच्या बहिणीला गीताला (तब्बू) भांडण-मारामारी यांचा प्रचंड तिटकारा आहे. या लढाईत आपलं संपूर्ण कुटुंबच पणाला लागू शकतं, याची तिला प्रचंड धास्ती आहे. त्यानंतर, कथेला नवीन वळण मिळतं... आणि मग सुरू होते `आम आदमी` आणि राजनेत्याची `आर या पार`ची लढाई... आणि त्यानंतर...
सिनेमाचं संगीत...
सिनेमातील `तेरे नैना...` हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालंय. हे गाणं अत्यंत सुंदर पद्धतीनं चित्रीत झाल्याचंही एव्हाना प्रेक्षकांच्या लक्षात आलंय.
सोबतच, `अपना काम बनात...` हे गाणंदेखील अत्यंत लोकप्रिय ठरलंय. सत्ताधारकांची टर उडवणारं गाणं तरुणांमध्ये चांगलच लोकप्रिय ठरलंय.
सलमानची `जय हो`...
वांटेड, दबंग आणि रेडीसारखे सलमानचे नुकतेच आलेले काही सिनेमे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरले होते. परंतु, `जय हो` या सिनेमांपेक्षा थोडा फार वेगळा असल्याचं दिसतं.
`जय हो` या सिनेमात `मुन्नाभाई एमबीबीएस`प्रमाणे एक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेलाय... पण, या सिनेमाचा अंदाज काही औरच आहे. आणि जर तुम्ही सलमानचे फॅन असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच पसंत पडेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.