प्रमुख कलाकार : जॉन अब्राहम, नरगिस फाखरी आणि राशी खन्ना
निर्माता : जॉन अब्राहम
दिग्दर्शक : शुजीत सरकार
संगीतकार : शंतनु मोइत्रा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकताच रिलीज झालेला ‘मद्रास कॅफे’ सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा हटके आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली सिनेमात भरपूर सारे प्रेम गीत, नाच-गाणं किंवा आयटम साँगचा मसाला पुरेपूर प्रमाणात भरलेला दिसतो. कदाचित यामुळेही मुख्य प्रवाहांतील सिनेमांकडे प्रेक्षक फारसा वळलेला दिसत नाही. परंतु, मद्रास कॅफे हा सिनेमा मुख्य प्रवाहातून बाहेर पडून काहीतरी वेगळं प्रेक्षकांपुढे मांडतो... आणि हा सगळा प्रयत्न रोमांचक झाल्यानं तो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय. समाज आणि सत्यता यांचा ताळमेळ साधताना शुजीत सरकारनं या सिनेमात नवीन प्रयोग केलेत.
या सिनेमातील घटना आणि पात्र एकमेकांसोबत अशा पद्धतीनं गुंफल्या गेल्यात की त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या कथेशी एकरुप होतो. या राजनीतिक थ्रीलर सिनेमाच्या कमतरता न काढलेल्याच बऱ्या...
श्रीलंका आणि राजीव गांधी
मध्यस्थ आणि शांतीचे प्रयत्न असफल ठरल्यानंतरही श्रीलंकेच्या घरच्या भांडणात भारत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सहभागी राहिलेला आहे. ‘मद्रास कॅफे’ या सिनेमात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी एक बाजू आहेत. त्यांच्याशी निगडीत घटनांना रचण्याचा प्रयत्नही इथं केला गेलाय.
काय आहे कथानक
श्रीलंका सिव्हिल वॉर दरम्यान अंडरकव्हर रॉ एजंट विक्रम सिंह (जॉन अब्राहम) याला एका ऑपरेशनसाठी जाफनामध्ये पाठवलं जातं. विक्रमकडे जाफनाच्या ‘एलटीएफ’शी (लिबरेशन ऑफ तामिळ फ्रंट) संबंधित नेता अन्ना याला हिंसात्मक कारवायांपासून रोखणं आणि शांतीसेनेला या भागाचा ताबा मिळवण्यासाठी तयार करणं या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतानाच इथं तर यापेक्षा आणखीन भयंकर अशा कारवायांची आखणी सुरू असल्याचं विक्रमच्या लक्षात येतं.
प्रभावी दृश्यं
‘मद्रास कॅफे’ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांवर ताबा मिळवण्यात सफल झालाय. युद्धाचे जबरदस्त सीन्स प्रेक्षकांना हादरवून टाकणारे आहेत. चित्रपट संपल्यानंतरही ही दृश्यं लवकर डोळ्यांसमोरून हलण्यास तयार होत नाही. उगाचचची नौटंकी, गाणी आणि लव्ह स्टोरीपासून हे काहीतरी वेगळं आहे हे स्क्रिनप्लेवरून लगेचच प्रेक्षकांच्या लक्षात येतं.
एका दृश्यात जॉनच्या एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. हा सीन कोणत्याही अतिरेकाशिवायही अतिशय प्रभावी झालाय. या दृश्यातलं दु:ख प्रेक्षकांनाही जवळचं आणि खरंखुरं भासतं. ‘एक था टायगर’सारख्या चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे एक ‘लार्जर दॅन लाईफ’ हिरो आपल्याला दिसतो तसा हिसो मात्र तुम्हाला या चित्रपटात दिसणार नाही. त्याचप्रमाणे एका ‘रॉ एजंट’चं अतिनाटकी चरित्र पाहायला मिळेल, या आशेनं तुम्ही चित्रपट पाहायला गेलात तर तुमची निराशा होण्याची जास्त शक्यता आहे.
परफॉर्मन्स
जॉन अब्राहमचा आत्तापर्यंत हा सर्वोत्कृष्ठ परफॉर्मन्स आहे असंही तुम्ही म्हणू शकाल. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना जॉन तुम्हाला आश्चर्यचकीत करू शकतो. शुजीत सरकार तर आपल्याला हवा तसा पडद्यावर सादर करण्यात नेहमीच चर्चेत असतो. परंतु, इथं तुम्हाला मोठा आश्चर्याचा झटका देईल ती नर्गिस फाकरी... हा चित्रपट तिच्या उल्लेखाशिवाय अर्धवट ठरेल. मूळ भारतीय पण एक ब्रिटिश पत्रकार ‘जया साहनी’च्या भूमिकेला तिनं पुरेपूर न्याय दिलाय. सिद्धार्थ बसूनंही आपल्या पहिल्याच चित्रपटात रॉ डायरेक्टर रॉबिन दत्तची भूमिका पार पाडलीय. एका गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो शोभून दिसतो.
चित्रपटाचं संगीत
तसं पाहिलं तर या सिनेमात हिरो-हिरोईनवर चित्रीत केलेलं एकही गाणं नाही पण शंतनु मोईत्राचं ‘बॅकग्राऊंड म्युझिक’ मात्र भन्नाट जमलंय. दृश्यांना प्रभावशाली बनवण्यासाठी हे म्युझिक चांगल्या पद्धतीनं वापरण्यात आलंय.
शेवटा काय तर...
छोट्य-छोट्या कमतरता सोडल्या तर मद्रास कॅफे हा गेल्या काही दिवसांतील उत्कृष्ठ चित्रपट म्हणायला हवा. खऱ्याखुऱ्या घटनांनी प्रेरित झालेला हा सिनेमा तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीनं पडद्यावर सादर उतरवण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर ज