‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!

कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 09:51 AM IST

www.24taas.com, मुंबई
कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं मान्यता दिली असल्यानं प्रदर्शनासाठी अडचणीचा प्रश्नच नाही. मात्र, कुणी कोर्टात गेल्यास त्याबाबतच्या आदेशाचं पालनही केलं जाईल असंही आबांनी म्हटलंय.

आबांच्या या घोषणेमुळे निश्चितच अभिनेता कमल हसनला थोडा दिलासा मिळाला असेल.. या सिनेमाला तामिळनाडूमध्ये झालेल्या विरोधानंतर चांगलाच हताश झालेल्या कमल हसन यानं ‘आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपण देश सोडून जाऊ’ असंही म्हटलं होतं. पण, त्यानंतर मात्र थोडं सावरून त्यानं गुरुवारी आपली बाजू स्पष्ट केली. ‘माझ्या सिनेमावर असेल्या बंदीमुळे मी दुखावलो गेलो आहे. विश्वरूपम सिनेमातून मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत. त्यामुळे मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. या लढाईत मला समर्थन देणाऱ्या हजारो समर्थकांचे मी आभार मानतो’ असं कमल हसन यावेळी स्पष्ट केलं होतं. याचबरोबर आपण देश सोडण्याची केलेली भाषा हा त्यावेळचा माझा उद्वेग होता, असं कमल हसन यांनी म्हटलंय.