www.24taas.com, अलाहबाद
‘सरकायलो खटिया जाडा लगे’सारखं गाणं आणि ‘लालकृष्ण आडवाणी यांचं मोठा नेता होणं’ या एकाच पातळीवरच्या गोष्टी आहेत, असं विधान जावेद आख्तर यांनी केलं आहे. चित्रपटसृष्टीला १०० वर्षं झाल्यानिमित्त १३ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बोलताना प्रख्यात गीतकार, संवाद लेखक जावेद आख्तर हे चित्रपटसृष्टीबद्दल बोलता बोलता राजकारणावर घसरले आणि त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं.
८०च्या दशकात चित्रपट, कला, संगीत या सगळ्याच बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाचं होतं. या काळात कुठलाही चांगल्या दर्जा म्हणावा असा सिनेमा वा उत्तम दर्जाचं संगीत आलं नव्हतं, असं जावेद आख्तर यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच ‘सरकायलो खटिया जाडा लगे…’सारखं तद्दन फालतू गाणं तुफान गाजलं. यामुळे ८० च्या दशकातल्या लोकांची हीन अभिरुची दिसून येते. तसंच राजकारणातही ८०च्या दशकात लालकृष्ण आडवाणींसारखा नेता मोठा बनला, याचं कारणही लोकांची खालावलेली अभिरुचीच असल्याचं आख्तर म्हणाले.
‘सरकायलो खटिया’ आणि ‘लालकृष्ण आडवाणी’ हे एकाच दुकानातून निघालेली उत्पादनं आहेत’, असं जावेद आख्तर म्हणाले. आपलं म्हणणं काही लोकांना आवडणार नाही. पण आपलं म्हणणं हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही आख्तर म्हणाले.