www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.
न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्युल्लमची डबल सेंच्युरी आणि भारताच्या टॉप ऑर्डर बॅट्समनच्या फ्लॉप शोमुळं पहिल्या ऑकलंड टेस्टवर न्यूझीलंडनं आपली पकड मजबूत केली आहे. टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत आहे. भारताकडून रोहित शर्मा ६७ आणि अजिंक्य रहाणे २३ रन्सवर खेळत आहेत. टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला आजून १७४ रन्सची गरज आहे.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर बॅट्समननं साफ निराशा केली. शिखर धवन खातंही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मुरली विजय २६, चेतेश्वर पुजारा १ आणि विराट कोहली केवळ ४ रन्स काढू शकला. टीम इंडियानं ५१ रन्सवर चार विकेट्स गमावल्या असताना रोहित शर्मानं एक बाजू लावून धरत इनिंग सावरली.
तत्पूर्वी पहिल्या दिवसाच्या ४ विकेट्स ३२९ रन्सच्या पुढं खेळताना न्यूझीलंडनं ५०३ रन्सचा विशाल स्कोअर उभा केला. १४३ रन्सच्या पुढं खेळताना मॅक्युल्लमनं २२४ रन्सची शानदार इनिंग खेळली. तर कोरे अँडरसननं ७७ रन्सची दमदार इनिंग खेळली. त्यांच्या याच खेळीच्या जोरावर किवी पाचशेचा टप्पा ओलांडू शकले. टीम इंडियाकडून ईशांत शर्मानं सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर झहीर खानला २ विकेट्स मिळाल्या.
आता टीम इंडियाला कमबॅक करायच असेल तर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅट्समनला किवी बॉलर्सचा धैर्यानं मुकाबला तर करावाच लागेल याशिवाय रन्सही कराव्या लागतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.