‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मधून सचिन आऊट!

सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2013, 02:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
क्रिकेट जगातील टॉप टेन टेस्ट रनगेटर्सना अंपायर डिकी बर्ड यांच्या ‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. सुनिल गावसकरांना ओपनर म्हणून बर्ड यांच्या टीममध्ये जागा मिळाली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.
सचिन रमेश तेंडुलकर... विक्रमांचा बादशाह... आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरींची सेंच्युरी करणारा एकमेव क्रिकेटर... मात्र, अंपायर डिकी बर्ड यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेल्या टेस्टमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरला स्थानच दिलेलं नाही. सचिनला संधी न दिल्यानं साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सचिनप्रमाणेच वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगलाही अकरा जणांमधून दूर ठेवण्यात आलंय. इतकच नाही तर सर डॉन ब्रॅडमन यांचाही विचार या टीमसाठी करण्यात आलेला नाही. भारताकडून सुनिल गावसकरांना ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे.
लिटल मास्टर सुनिल गावसकर आणि बॅरी रिचर्डला ओपनिंगसाठी या टीममध्ये स्थान देण्यात आलंय. वेस्ट इंडियन धडाकेबाज बॅट्समन विवियन रिचर्ड्स, ग्रेग चॅपेल सर गार्फ्रिल्ड सोबर्स आणि ग्रॅमी पॉलक मिडल ऑर्डरची जबाबदारी संभाळणार आहेत. इंग्लिश विकेटकिपर ऍलन नॉटवर विकेटकिपींगची भिस्त असेल. शेन वॉर्न आणि लान्स गिब्सकडे स्पिन डिपार्टमेंट असेल. तर इम्रान खान या टीमचा कॅप्टन असणार आहे. डेनिस लिलि फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील.
आपल्या सार्वकालिन ग्रेट टीममध्ये डिकी बर्डनी अनेक धक्कादायक नावांचा समावेश केलाय. तर टेस्टमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंना डावलल्यानं क्रिकेटविश्वात याबाबत उलट-सुलट चर्चा निर्माण झाल्य़ात.

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग टेस्टमध्ये ९० च्या दशकापासून आतापर्यंतचे हे बेस्ट टेस्ट प्लेअर्स मात्र यांना संधी का नाही? असा प्रश्न उपस्थित झालाय. शेन वॉर्न महान स्पिनर आहे यात कुठलही दुमत नाही. मात्र, अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरनच्या नावाचा साधा विचारही या टीमसाठी केलेला दिसत नाही. तर क्रिकेटचे पितामह सर डॉन ब्रॅडमन यांना का दूर ठेवण्यात आलं हेही एक न उलगडणार कोड आहे. मायकल होल्डींग, माल्कम मार्शल आणि ग्लेन मॅकग्रालाही स्थान मिळायला हवं होतं, अशीही एक चर्चा आहे. डीकी बर्ड यांच्या टीममध्ये काही अनपेक्षित नावांचा समावेश आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात. त्यातच डॉन ब्रॅडमन आणि सचिनचं नाव त्यांच्या टीममध्ये का नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय.