www.24taas.com , झी मीडिया, मोहाली
बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळं तिसऱ्या मोहाली वन-डेमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला. धोनीची सेंच्युरी आणि कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं कांगारुंसमोर ३०४ रन्सचं आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्स कांगारुंच्या बॅट्समनला वेसण घालण्यात अपयशी ठरले. यामुळंच टीम इंडियाला तिसऱ्या वन-डेमध्ये ४ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली.
मोहाली वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो जेम्स फॉकनर ठरला तर भारताच्या विजयाचा व्हिलन ईशांत शर्मा ठरला. कांगारुंसमोर विजयासाठी ३०४ रन्सचं टार्गेट ठेवणाऱ्या टीम इंडियासाठी ४७व्या ओव्हरपर्यंत मॅच हातात होती. तोपर्यंत कांगारुंना विजयासाठी १८बॉल्समध्ये ४४ रन्सची गरज होती. मात्र, ईशांत शर्मानं टाकलेल्या ४८व्या ओव्हरमध्ये जेम्स फॉकनरनं ३० रन्सची लुट करत मॅचचं चित्रच पालटलं.
या एका ओव्हरमध्ये फॉकनरनं चार उत्तुंग सिक्स आणि एक फोर खेचला तर दोन रन्स काढल्या. फॉकनरनंच मग विनय कुमारला सिक्स खेचत कांगारुंच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिल्या दोन वन-डेप्रमाणं तिसऱ्या वन-डेमध्येही टीम इंडियाच्या बॉलर्सनं फ्लॉप शो केला आणि टीम इंडियाचा ४ विकेट्सनं पराभव झाला. अखेरच्या ओव्हर्समध्ये कांगारुंच्या तळाच्या बॅट्समननं भारतीय बॉलर्सची धुलाई केल्यामुळं भारताचा पराभव झाला आणि सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने २-१नं आघाडी घेतली. २९ बॉल्समध्ये नॉट आऊट ६४ रन्स आणि एक विकेट घेणाऱ्या फॉकनरलाच `प्लेअर ऑफ द मॅच`नं गौरवण्यात आलं.
कांगारूंकडून ऍडम वोग्जनेदेखील नॉट आऊट ७६ आणि जॉर्ज बेलीनं ४३ रन्स केल्या. तर फिलिप हयुजेस आणि ऍडम फिंचनं ६८ रन्सची ओपनिंग दिली. भारतीय बॉलर्सच्या क्षमता या वन-डेमध्ये पूर्णपणे उघड झाल्या. विनय कुमारनं पहिला ब्रेक-थ्रू मिळवून दिला. मात्र तोपर्यंत कांगारुंनी चांगली पायाभरणी केली होती. ईशांत शर्मा, भुवेनश्वर कुमार आणि रवींद्र जाडेजा प्रत्येकी एकच विकेट घेऊ शकले. तर आर. अश्विनला एकही विकेट घेता आली नाही.
तत्पूर्वी भारतीय ओपनर्सदेखील चांगली ओपनिंग देऊ शकले नाहीत. रोहित आणि धवन अनुक्रमे ११ आणि ८ रन्सवर आऊट झाले. तर रैना १७ रन्सवर माघारी परतला. लोकल बॉय युवी तर खातंही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र धोनीनं नॉट आऊट १३९ रन्सची कॅप्टन्स नॉक खेळली. तर विराट कोहलीनं हाफ सेंच्युरी झळकावली. धोनी आणि कोहलीनं कांगारुंसमोर आव्हानात्मक आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्सच्या अपयशामुळं टीम इंडियाच्या पदरी पराभव पडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.