www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागची बॅट आग ओकते, मात्र संघाकडून देशासाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत. सेहवाग केवळ क्लबसाठी खेळतो, देशासाठी खेळत नाही, असे बोलून कर्णधार धोनीने खळबळ उडवून दिली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवागदरम्यानचा वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. ऑस्टे्रलिया दौर्यात त्यांच्यात झालेला वाद मिटवण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकार्यांना धाव घ्यावी लागली होती. आयसीसी चॅम्पियन टी-२० विश्वचषक स्पर्धेतही या दोघांत मोठी खडाजंगी झाली असल्याचे समोर आले आहे.
या स्पर्धेच्या सुपर-८ सामन्यात वीरेंद्र सेहवागला धोनीने संघाबाहेर केले होते. यावर सेहवागने त्याला फार तिखट प्रतिक्रिया दिली होती. धोनीच्या या पावलावर सेहवागने थयथयाट केला होता. धोनी म्हणाला होता की, सेहवाग इंडिया संघाप्रति निष्ठावान नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना तो दणदणीत खेळतो. मात्र टीम इंडियात तो त्याच त्वेषाने खेळत नसल्याचा आरोप धोनीने केला होता. लवकर फिट कसा झाला? वीरेंद्र सेहवागला सुपर-८च्या दोन सामन्यांत खेळवले गेले नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सेहवाग जायबंदी झाला होता आणि त्याला एका महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र स्पर्धा संपताच तो फिट झाला आणि दक्षिण आफ्रिकेत होणार्या चॅम्पियन टी-२० लीग स्पर्धेसाठी सेहवाग रवानादेखील झाला आहे.