www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
सध्या क्रिकेटच्या मैदानावर आयपीएल -६ ची धूम आहे. त्यातच ख्रिस गेलचं वादळ चर्चेचा विषय ठरला असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदम चर्चेत आलाय. मात्र, तो चांगल्या कारणाने नाही. त्याचा क्रिकेट प्रेक्षकांनी हुर्यो उडविल्याने तो चांगलाच भडकलाय.
अंबाती रायडूला धावचीत करण्यावरून मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांनी उडविलेल्या हुर्योवर कोहली भलताच संतापला. मी आपल्या देशाकडूनही खेळतो हे विसरू नका, अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केलीय.
शनिवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रायडूला धावचीत करण्यावरून हा वाद निर्माण झाला. कोहलीने थेट चेंडू फेकून यष्टी उडविल्या, पण त्या वेळी रायडूची बॅट गोलंदाज विनय कुमारच्या पायाला लागून हवेत गेली. तिसऱ्या पंचांनी नियमानुसार रायडूला धावचीत ठरविले.
समोरचा फलंदाज पोलार्डने पंच आणि कोहलीकडे नापसंती व्यक्त केली. पण कोहली आपल्या निर्णयावर ठाम होता. हा सर्व प्रकार स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक पाहत होते. त्यांनी त्या वेळेपासून कोहलीची हुर्यो उडविण्यास सुरूवात केली.
कोहली फलंदाजीस आल्यानंतर आणि तो बाद झाल्यानंतरही ही हुर्यो कायम होती. त्यामुळे संतापलेल्या कोहलीने सामन्यानंतर जाहीर शब्दांत मुंबईच्या प्रेक्षकांवर आपली नाराजी व्यक्त केली.
आयपीएल ही सर्वोच्च स्पर्धा नाही आणि ज्या खेळाडूंची आपण हुर्यो उडवत आहोत ते आपल्या देशाकडूनही खेळत आहेत हे ते का विसरतात, आता मी पुन्हा देशाकडून खेळताना हेच प्रेक्षक पुन्हा माझ्यासाठी टाळ्या वाजवतील, असे कोहली म्हणाला.