मोहालीत पुजाराची बॅट तळपणार?

टीम इंडियाची दुसरी वॉल आणि नंबर तीन सारख्या अत्यंत महत्वाच्या जागेवर आपणच योग्य पर्याय आहोत अशी ग्वाही देणारा चेतेश्वर पुजारा दुखापत ग्रस्त झाला होता.

Updated: Mar 13, 2013, 05:55 PM IST

www.24taas.com, मोहाली
टीम इंडियाची दुसरी वॉल आणि नंबर तीन सारख्या अत्यंत महत्वाच्या जागेवर आपणच योग्य पर्याय आहोत अशी ग्वाही देणारा चेतेश्वर पुजारा दुखापत ग्रस्त झाला होता. पुजाराच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मोहाली टेस्ट सुरु होण्यापूर्वी त्याच्या या दुखापतीमुळे टीम इंडियात नक्कीच चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. पण मोहालीतही त्याची बॅट तळपेल अशी अपेक्षा आहे कारण त्याची ही दुखापत मोठी नसून कांगारुंविरुद्ध दोन हात करण्यास तो सज्ज आहे. मोहालीत प्रॅक्टिस सेशन दरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली.
महत्वाचं म्हणजे त्याच्या उजव्या गुडघ्याला यापूर्वी जबर दुखापत झाली होती. आणि त्यामुळे चेतेश्वरला तब्बल वर्षभर क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. मोहालीत झालेली पुजाराची ही दुखापत इतकी मोठी नसली तरी त्याच्या या दुखापतीमुळं त्याच्या खेळण्यावर किंवा त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ नये हीच चाहत्यांची इच्छा आहे. कारण नंबर तीनवर येणारा पुजारा हा सध्या तुफान फॉर्मात आहे.
कांगारूंविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये त्यानं 2 टेस्ट मॅचेसच्या 3 इनिंग्समध्ये 58.31 च्या सरासरीनं 256 रन्स काढलेय. यात एका डबल सेंच्युरीचाही समावेश आहे. द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या पुजारानं टीम इंडियात एंट्री घेतली. द्रविडची पोकळी पुजारा भरुन काढेल अशी आशा सर्वांनाच होती आणि त्यानंही त्याच्यावरचा विश्वास सार्थ करुन दाखवला. पुजारानं अगदी कमी वेळातच आपला क्लास दाखवून दिला.
अवघ्या ११ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या पुजारानं 67.80 च्या सरासरीनं 1017 रन्स केलेत. या 1017 रन्समध्ये पुजारानं 1 हाफ सेंच्युरी तर 4 सेंच्युरीज झळकावल्यात. अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्धची 206 रन्सची नॉटआऊट ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरलीय.
टेस्टमध्ये 1000 रन्सचा टप्पा पार करणारा तो सेकण्ड फास्टेस्ट भारतीय बॅट्समन ठरलाय. आणि आता आपल्या याच फॉर्मचा अजून एक जलवा मोहालीत दाखवण्यास पुजारा सज्ज झालाय. गुडघ्याला दुखापत झाली आणि आता ती बरीही झाली असून पुजारा फिट आहे अशी माहिती शिखर धवननं दिलीय. त्यामुळेच पुजारा मोहालीतही आपली कांगारुंना चमक दाखवल्याशिवाय राहणार हे नक्की...