www.24taas.com, मुंबई
जहांगीर अन्सारी... कोणत्याही प्रकारची क्रिकेटची पार्श्वभूमी नाही, घरची परिस्थिती बेताचीच. या साऱ्या प्रतिकूल परिस्थिवर मात कणाऱ्या १३ तेरा वर्षांच्या या मुंबई अंडर १४ टीमच्या क्रिकेटरची संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी...
मैदानात घाम गाळताना रोजच्या जगण्यासाठीही या १३ वर्षीय क्रिकेटरला संघर्ष करावा लागतोय. पोट भरण्यासाठी भरण्यासाठी तो भावाला टेलरिंगच्या व्यवसायात मदत करत असतो. जहांगिरसाठी क्रिकेटची साधनसामुग्री घेण्यासाठी भावानेही कर्ज काढले. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही हा पठठ्या क्रिकेटचं मैदान गाजवतोय.
मुंबई अंडर १४ पॉली उम्रीगर विजेत्या टीमचा जहांगिर एक शिलेदार... मूळचा झारखंडचा असलेल्या जहांगिरला बालपणीचं टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला पाहून क्रिकेटचं वेड लागलं आणि त्यामुळेच वयाच्या सातव्या वर्षी क्रिकेटचे धडे घेण्यासाठी त्यानं थेट मुंबई गाठलं. मात्र, क्रिकेटचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी जहांगिरपाशी ना पैसा ना साधनसामुग्री... मात्र, जहांगिर जिद्दीनं क्रिकेटच्या मैदानात उतरला. घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं क्रिकेटची प्रत्येक पायरी चढताना जहांगिरच्या अडचणी वाढत होत्या. मात्र, त्यामुळे तो डगमगला नाही आणि नवी मुंबईत नेरुळ जिमखान्यावर कोच जलील शेख यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागला.
मॅकग्राप्रमाणे जागतिक दर्जाचा बॉलर होण्याचं स्वप्न बाळगणारा जहांगिर हा बेलापूरच्या आग्रोली गावात राहतो आणि बेलापूरच्याच विद्याप्रसारक हायस्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिकतो. जहांगिरचे आईवडील झारखंडला गावी असतात. तो आपल्या भावाकडे राहतो. त्याचा मोठा भाऊ सतार अन्सारी आग्रोली गावात एक टेलरिंगच दुकान चालवतो आणि जहागिर त्याला जमेल तशी शिवणकामात मदतही करतो. महत्त्वाचं म्हणजे दहा बाय दहाचं दुकान हेच जहांगिरचं घरही आहे. जहांगिरला क्रिकेट खेळताना कोणतीही अडचण नको म्हणून जहांगिरच्या भाऊ धडपड करत असतो. जहांगिरसाठी त्यानं कर्जही काढलंय.
क्रिकेट हा खर्चिक खेळ म्हणूनच आपलं हे स्वप्न साकार करण्यासाठी जहांगिरला प्रसंगी उपाशी पोटीही झोपावं लागतं. जीवनाशी संघर्ष करणारा जहांगिर जिद्दीने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतोय.