तेव्हापासून दिवाळीच... ( अनुभव )

दादर स्टेशनवर उभा होतो. ५.१२ ची अंबरनाथ फास्ट पकडायचीच होती. गाडी आली, नेहमीप्रमाणे सेकंडला गर्दी होतीच. पण गाडीत घुसायचंच होतं.. पूर्वी असा निर्धार वगैरे करायचो नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 1, 2013, 09:43 PM IST

.
.

दादर स्टेशनवर उभा होतो. ५.१२ ची अंबरनाथ फास्ट पकडायचीच होती. गाडी आली, नेहमीप्रमाणे सेकंडला गर्दी होतीच. पण गाडीत घुसायचंच होतं.. पूर्वी असा निर्धार वगैरे करायचो नाही. गर्दीमुळे एक-दोन गाड्या सोडायचो, पण आता नाही, गेल्या दोन वर्षांपासून ऑफीसमधून बाहेर पडलो की थेट घरीच जातो. त्यासाठी कितीही रेटारेटी झाली तरी पळतोच. त्याला कारण आहे माझा मुलगा अंगद. ऑफीसमध्ये काम करून मग गाडीत गर्दीत उभा राहून कितीही दमलेलो असलो तरी घरी गेल्यावर अंगदने दारात उभं राहून मामिन(अमित) अशी हाक मारली की सगळा शीण निघून जातो..

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर २०११ या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी होती. आदल्या दिवशी वैशालीला ऍडमिट केलं होतं.. २४ तारखेला डिलिव्हरी होणार हे नक्की झालं होतं. प्लॅन वगैरे काही केलं नव्हतं.. पण योगायोग जुळून आला आणि अंगद दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलासुद्धा.. त्याच्या जन्मानंतर २० ते २५ मिनिटांनी नर्सने बाहेर त्याला माझ्या हातात दिलं. तेव्हापासून माझं जगच बदलून गेलंय. त्याला पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा खरं म्हणजे ते जग थांबलं होतं काहीक्षण.. तो पहिला आनंदाचा झटका ओसरल्यावर जग खरोखर बदलल्याचा अनुभव मी घेतलाय. मी सांगतोय त्यात नवं असं अजिबात काही नाही.. आपल्यातल्या प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल, किंवा ज्यांनी अजून घेतला नाही त्यांनी तो अनेकांकडून ऐकलाही असेल. तरीही मला तो लिहावासा वाटतोय.

घरात बाळ आल्यापासून सुरू झालेली ही दिवाळी मी अनुभवतोच आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीत मला काहीतरी नवं दिसतं. लहानपण मीही अनुभवलं. पण दुस-याचं लहानपण अनुभवण्यासाठी स्वतः परत लहान होण्याचं सुख हे आपल्या बाळामुळेच मिळतं हा पहिला धडा मला माझ्या मुलामुळे मिळाला. त्याच्या बारशाची तयारी, पहिल्या वर्षभरातले त्याच्यासाठीचे काही विधी, त्याचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस, त्याची शी, शू, त्याचा आलेला प्रत्येक दात, त्याच्यासाठी खेळणी घेणं असो, कपडे घेणं असो.. त्याच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी असो अनेक गोष्टीत मला काही तरी नविन अनुभवायला मिळालं. माझं लहानपण मी जगत असताना हे सगळं असंच झालं असेल. त्यावेळी माझ्या आईबाबांना काय वाटत असेल ते मला आत्ता अंगदमुळे समजतंय. असं म्हणतात लहान मुलाशी खेळताना आपल्याला त्याच्या उंचीला येऊन खेळावं लागतं. त्याच्याशी बोलताना आपल्यालाही त्याच्या भाषेतच बोलावं लागतं.. हे सगळं तंतोतंत तसंच होतंय. त्यातून मी खूप बदललो. माझा थोडा चिडका, ‘अहं’वाला स्वभाव मागे पडला. रात्री झोपताना आपल्या शेजारी एक बाळ आहे त्यामुळे मनात येईल तसं लोळता येणार नाही, सावध झोपावं लागेल ही जाणीव नकळत माझ्या स्वभावातल्या बेफिकीरीला संपवायला लागली. गोष्टी, माणसं जपणं म्हणजे काय असतं ते या छोट्याशा उदाहरणातून कळायला लागलं.. अनेक गोष्टी आपल्याला रोजच्या वापरात साध्यासुध्या वाटतात, पण त्या सहज वाटणा-या गोष्टीसुध्दा प्रत्येकाला शिकाव्या लागतात. त्या शिकवताना लागणाला पेशन्स माझ्या या पोरामुळे मला मिळतोय.

स्वार्थाची शिंगं फुटण्याआधी माणूस हा प्राणी किती निरागस, निष्कलंक असतो हे आपल्या बाळाकडूनच आपण शिकू शकतोय याचीच जाणीव मला प्रत्येकवेळी होतेय. अगदी साध्या छोट्या सोप्या गोष्टीतही आनंद, मौज दडलेली असते हे सध्या मी शिकतोय. एटीएममधून पैसे बाहेर आल्यावर त्यावर ‘पिशा’ असा आनंदाचा चित्कार करून अंगद मला त्यातली मौज शिकवतोय.. उदाहरणं खूप आहेत देण्यासारखी, किती देणार? जाता एक गंमत सांगतो, या २४ ऑक्टोबरला त्याचा दुसरा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आलेल्या मुलांमधे तो खूप खेळला. रात्री झोपेत तो थोडा चुळबुळत होता. दुस-या दिवशी झोपेतून उठल्यावर मी त्याला विचारलं, अंगद झोप झाली का.. रात्री स्वप्न पडलं का.. स्वप्नात कोण आलं होतं.. त्यावर त्याने उत्तर दिलं, “बाप्पा”. मी त्याला विचारलं मग बाप्पा काय म्हणाला, त्यावर त्याने उत्तर दिलं.. “अंगद अंगद, हॅपी टू यू..“ मग तू काय म्हणालास.. त्यावर त्याचं उत्तर होतं.. बाप्पा मोय्या... देव असतो की नाही मला माहित नाही.. पण त्याच्या निरागसतेकडे पाहिल्यावर देवाचा अंश प्रत्येक मुलात असतो यावर माझी नक्की श्रद्धा आहे..

माझा मुलगा काही जगावेगळा आहे असं अजिबात नाही, त्याचं आणि माझं नातं हे सुदधा चारचौघा मुलाबापासारखंच आहे.. तरीही माझ्यासा