'राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल'ची मान्यता धोक्यात

पुणे महापालिकेचं राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ही कोट्यवधी खर्चून उभारलेली हाय प्रोफाईल शाळा आहे. ही शाळा शिक्षणापेक्षा नेहमी वादामुळे चर्चेत राहिली. यावेळचा विषय मात्र अधिक गंभीर आहे. थेट विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच यावेळी पणाला लागलंय.

Updated: Jun 19, 2012, 05:52 PM IST

www.24taas.com, पुणे

पुणे महापालिकेचं राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ही कोट्यवधी खर्चून उभारलेली हाय प्रोफाईल शाळा आहे. ही शाळा शिक्षणापेक्षा नेहमी वादामुळे चर्चेत राहिली. यावेळचा विषय मात्र अधिक गंभीर आहे. थेट विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच यावेळी पणाला लागलंय.

साधारण महिन्याभरापूर्वी महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची अक्षरशः रांग लागली होती. मात्र आता या पालकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. सी.बी.एस.सी. बोर्डानेच शाळेतल्या अनेक त्रुटी समोर आणल्या आहेत. तसं पत्रच बोर्डानं शाळेला दिलंय.  या शाळेत प्रशिक्षित शिक्षकच नाहीत. शाळेकडे पुरेशी जागा नाही. त्याचबरोबर शाळेजवळ मैदानही नाही. शाळेनं या त्रुटी भरून काढल्या नाहीत, तर शाळेला मान्यता मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय.

या पत्रानंतर शिक्षण मंडळानं शाळेसाठी कसंबसं मैदान शोधून काढलंय. मात्र, ते शाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. अशी कबुली शिक्षण प्रमुखांनीच दिलीय. मैदान अर्धा किलोमीटरवर आहे. असं, शिक्षण प्रमुख सांगत असले, तरी प्रत्यक्षात हे मैदान शाळेपासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. राजीव गांधी ई लर्निंग शाळेसाठी महापालिकेने आजवर तब्बल १७ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही या शाळेला मान्यता मिळणं एकूण कठीणच दिसतंय.