भावी पत्रकारांना राजकारणाचे धडे

नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष त्यांची ध्येयधोरणं युवकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताहेत. यामुळं राजकारणाचे अंतरंग जवळून पाहता येत असल्यानं युवकांनीही राजकीय पक्षांच्या उपक्रमांचं स्वागत केलं आहे.

Updated: Dec 22, 2011, 08:59 PM IST

झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णी

 

नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष त्यांची ध्येयधोरणं युवकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताहेत. यामुळं राजकारणाचे अंतरंग जवळून पाहता येत असल्यानं युवकांनीही राजकीय पक्षांच्या उपक्रमांचं स्वागत केलं आहे.

 

एच.पी.टी. महाविद्यालयाचा वृत्तपत्र आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जातं आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अर्जून टिळे आणि महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर त्यांना मार्गदर्शन करत आहेत. महापालिका निवडणुकीला सामोरं जाताना विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि पक्षाची ध्येय धोरणं समजावून सांगण्यासाठी ही अनोखा उपक्रम इथं राबवण्यात येत आहे. वृत्तपत्र आणि जनसंज्ञापन विभागाच्या 'राजकीय जनजागृती कार्यक्रम' या उपक्रमामुळं राजकीय पक्षांना तरूणांपर्यंत पोचण्याची आयती संधी मिळाली आहे.

 

राजकीय जनजागृती कार्यमांतर्गत 'आजवरच्या महापौरांची कारकीर्द', 'नावडत्या नगरसेवकाची आरती', ' सत्ताधिका-यांनी नाशिककरांना काय दिलं ?  नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत ? यांचा समावेश असलेलं प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यामुळं शहराचा चेहराच इथं साकार झाल्यानं विद्यार्थ्यांनाही राजकारणा पलिकडच्या घडामोडींचा अभ्यास करता आला. नेत्यांचं शहर विकासाचं व्हिजन काय आहे ? आगामी निवडणुकांना ते कसं सामोरं जाणार आहेत ? हे या माध्यमातून विद्यार्थ्यांना जाणून घेता आलं. या उपक्रमामुळं राजकीय नेत्यांनाही त्यांचे विचार युवकांपर्यंत पोचवणं शक्य झालं. युवक मतदारांची संख्या मोठी असल्यानं हा टार्गेट व्होटर आपल्या बाजूनं असावा यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नाला जनसंज्ञापन विभागाच्या उपक्रमामुळं चालना मिळाल्याचं दिसून येतं आहे.