आकाश-२ येणार 'मुठीत', एप्रिलच्या 'सुट्टीत'

सर्वात स्वस्त टॅबलेट लॅपटॉप 'आकाश'च्या बाबतीत डाटाविंड या कंपनीसोबत असणारा करार हा अबाधित राहणार असल्याचे सोमवारी सरकारने स्पष्ट केलं. 'आकाश- २' हे टॅबलेट या वर्षीच्या एप्रिल महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.

Updated: Jan 17, 2012, 04:32 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

सर्वात स्वस्त टॅबलेट लॅपटॉप 'आकाश'च्या बाबतीत डाटाविंड या कंपनीसोबत असणारा करार हा अबाधित राहणार असल्याचे सोमवारी सरकारने स्पष्ट केलं.  तसचं पहिल्या लाख उत्पादनापैकी बाकी ७० हजार टॅबलेटची पूर्ती डाटाविंड कंपनी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'आकाश- २' हे टॅबलेट  या वर्षीच्या एप्रिल महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.

 

मनुष्य बळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आकाश टॅबलेटची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही प्रत्येक कॉलेज, विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसचं अनेक राज्यातून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

 

आकाश बाबतीत अनेक समस्या असल्याचे सिब्बल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आकाशच्या पहिल्या टॅबलेटमध्ये काही सुधारणा सुरू आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. आकाश - २ हे या वर्षीच्या एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे.

 

आकाश टॅबलेटचे मोठा  गाजावाजा करून  लाँचिंग केल्यानंतर आता केंद्र सरकारने जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट बनविणाऱ्या डाटाविंड या कंपनीशी पुढील काळात होणारा व्यवहार अधांतरीत ठेवला होता . या कंपनीचे पुढील कॉन्ट्रक्ट एक्सटेंड करण्याबाबत सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिला होता. जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशच्या २२ कोटी युनिटची गरज भासेल असं सरकारने म्हटलं आहे. शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यासाठी आकाश टॅब उपयुक्त ठरणार आहे.

 

सुरवातीला आकाशच्या एक लाख टॅबलेट विकत घेतल्या असल्या तरी येत्या काही वर्षात २२ कोटी टॅबलेटची गरज भासेल असं मनुष्य बळ विकास खात्याचे अतिरिक्त सचिव एन.के.सिन्हा म्हणाले. आकाश टॅबलेटच्या मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी परत एकदा निविदा मागवण्यात येणार असल्याचं तसंच आकाशची निर्माती असलेल्या डाटाविंडसह इतर कंपन्यांनाही निविदा प्रक्रियेत सहभागाची संधी मिळेल.