मुग्धा देशमुख, www.24taas.com, मुंबई
‘वा गुरू’ या गाजलेल्या नाटकाची टूर अमेरिकेला निघाली आहे. ९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत या नाटकाचा दौरा होणार आहे. मात्र या नाटकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरला व्हिसाच मिळालेला नाही.
वा गुरू!...मोटर न्युरॉन डिसीज हा जीवघेणा आजार झालेल्या प्राध्यापकाची आपल्या एका शिष्याशी भेट होते. त्याच्याबरोबर जुन्या आठवणीत रमता रमता प्राध्यापक त्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगतो.दिलीप प्रभावळकर आणि अद्वैत दादरकर यांनी वा गुरू नाटकात गुरू-शिष्याचा हा भाववंध गहिरेपणाने साकारला आहे. या नाटकाला भारतातच नाही तर परदेशातही उदंड प्रतिसाद मिळाला. स्वित्झर्लंडमध्ये या नाटकाचं ओपनिंग झालं. तिथे या नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहता आता हे नाटक अमेरिका दौरा कऱण्यासाठी सज्ज झालंय.
या नाटकात अद्वैतची भूमिका आधी अतुल परचुरे साकारायचा. मात्र अतुलनंतर अद्वैत ही भूमिका साकारत आहे. अद्वैत या भूमिकेला योग्यरित्या न्याय देतोय. असं असतानाच आता या नाटकाच्या अमेरिकाच्या महत्वपूर्ण दौऱ्याला अद्वैत मुकणार असंच दिसतंय. कारण अमेरिकेच्या दौ-यासाठी अद्वैतला व्हिसाच मिळालेला नाही. जर रिअप्लायमध्येही अद्वैतला जर व्हिसा मिळाला नाही तर अमेरिका दौऱ्यामध्ये अद्वैतची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता अमेरिकेतील नाट्यवेड्या रसिकांनाही आहे.