भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे साता-यात एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते माणसाच्या जीवावर बेतले आहे.

Updated: Aug 4, 2012, 11:02 PM IST

www.24taas.com, मुंबई/सातारा

 

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे साता-यात एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते माणसाच्या जीवावर बेतले आहे.

 

रमाकांत दळवी. या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात करुण अंत झालाय. रमाकांत साता-यात त्याच्या आजोळी आला असताना ही दुर्देवी घटना घडलीए. गोडोली परिसरातील शिवाजी कॉलेज परिसरात असलेल्या नाल्यात चायनीज गाड्यांवरचं खरकटं टाकलं जातं. त्यामुळे या परिसरात 10-12 कुत्रे कायम भटकत असतात. या मोकाट कुत्र्यांविषयी एक वर्षापूर्वीच नागरिकांनी नगरपालिकेत तक्रार दिली होती. मात्र कारवाई न झाल्यानं आज रमाकांतला प्राण गमवावा लागला.

 

राज्यात कुत्र्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झालाय तर हजारो जण जखमी झालेत.  2009 मध्ये राज्यात 77 हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला तर त्यात 18 जणांचा मृत्यू झालाय. 2010 मध्ये धुळ्यात देवपूर भागात एका सात वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला. पुण्यात जानेवारी ते ऑगस्ट 2011 मध्ये तब्बल 8 हजार जणांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या.

 

नवी मुंबईत गेल्या वर्षभरात 11 हजार 844 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. तर ठाण्यात 2011 मध्ये 33 हजार 882 जणांना चावा घेतला. या सर्व घटना पाहिल्यानंतर आणि साता-यात एका मुलानं आपला प्राण गमावल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

 

तर पुण्यात सध्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पुण्यात सध्या चाळीस हजारांवर भटके कुत्रे आहेत. आणि या चाळीस हजार कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडे फक्त एकच कर्मचारी आहे. पुण्यात सध्या कुत्रे उदंड झालेत. दिवसा उनाडक्या करणारे हे कुत्रे रात्री भुंकून भुंकून हैदोस घालतात. पिसाळलेले आणि आजारी कुत्रे नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरतायत.