www.24taas.com, मुंबई
गेल्या 12 वर्षांच्या आघाडी सरकारच्या कारकिर्दीत अनेक वेळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्रीपदी असताना अशोक चव्हाणांनासुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी असताना पहिल्यांदाच परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक झालीय. मात्र आजवर मंत्रिपदी अटक होणारे देवकर हे काही पहिलेच मंत्री नाहीत.
यापूर्वी 1999 मध्ये युती सरकारचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांना देखील साता-याचे नगरसेवक शरद लेव्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक झाली होती. आघाडी सरकारचा आजवरचा इतिहास बघता गुलाबराव देवकरांच्या आधी 2006 मध्ये सिद्धराम मेहेत्रे यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण त्यांनी जामीन मिळवल्यामुळे अटक टळली. तर 2006 मध्येच तत्कालीन परिवहनमंत्री स्वरूपसिंह नाईक यांना नंदूरबार जिल्ह्यातील वखारींना बेकायदेशीरपणे परवाने दिल्याबद्दल न्यायालयानं दोषी ठरवल्यानं मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना अटकही झाली.
तसंच 2008मध्ये चिंकारा शिकारप्रकरणी धर्मराव बाबा आत्राम यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यामुळं घोटाळ्यांची आणि मंत्रिपदे जाण्याची परंपरा महाराष्ट्राला तशी जुनीच आहे.