पंकज दळवी, www.24taas.com, मुंबई
केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघतेय. पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने सामान्यांच्य़ा वाहन वापरावर मर्यादा आल्यात. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.
केंद्रीय कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिजेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये खर्च केलेत. इंधनावर प्रचंड खर्च करणा-या मंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख आघाडीवर आहेत. दोन वर्षात विलासरावांनी 17 लाख 16 हजार रूपये इंधनावर खर्च करत 30 हजार 717 लीटर पेट्रोल वापरलंय.. एस एम कृष्णा यांच्या परराष्ट्र खात्याने 23 हजार 861 लिटर इंधनासाठी 16 लाख 51 हजार रुपये खर्च केलेत. गुलाम नबी आजाद यांनी 14 लाख 60 हजार रूपये इंधनावर खर्च करत 26, 555 लिटर इंधन वापरलंय. महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्री रेणुका चौधरी यांनी 18 हजार 952 लीटर पेट्रोल वापरलंय आणि त्यासाठी 10 लाख 70 हजार रुपये खर्च केलेत. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दोन वर्षात 9 लाख 66 हजार रुपये इंधनावर खर्च करत 17 हजार 723 लीटर इंधन वापरलंय...
2010 आणि 2011 या वर्षात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी मंत्र्यांना विमानात बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासचा वापर करण्याचे आदेश दिले होते. मात्र याच काळात मंत्र्यांनी वाहन इंधनावर करोडो रूपये उधळलेत. वास्तविक केंद्रिय मंत्र्यांना आणि त्यांच्या सहका-यांच्या वाहनाचा वापर दिल्लीतल्या दिल्लीत असतो. मंत्री जेव्हा आपपल्या मतदार संघता जातात तेव्हा विमानाने प्रवास करतात. मग तरीसुद्धा इंधानावर इतका खर्च कसा होतोय, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच रहातोय.