www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी आपली एकुलती एक १९ वर्षाची मुलगी गमावली. पण इतक्या कठीण प्रसंगातही या मातेनं मोठं दातृत्व दाखवलं. आपली दिवंगत कन्या हेमांगी हिचं लिव्हर, किडनी आणि डोळे असे अवयव दान करून त्यांनी मोठा आदर्श घालून दिलाय.
हेमांगी प्रभावळकर नेहमीप्रमाणे हसत खेळत उत्साही होती... अचानक तिचं डोकं दुखायला लागलं. पुढच्या दहा मिनिटात उलटी झाल्यानं अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. हॉस्पिटलमधे दाखल केल्यावर तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. ब्रेन हॅमरेजमुळं ती ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या असलेल्या निर्मला सामंत यांचा एकुलता एक आधार गेला. दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्यावर कोसळला. पण त्याही स्थितीत या मातेनं आपलं सामाजिक भान जपलं. आपल्या मुलीची किडनी, लिवर आणि डोळे दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केवळ हा निर्णय त्यांनी घेतला नाही, तर ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतेय की नाही याचीही खातरजमाही त्यांनी केली.
एका आईच्या या दातृत्वाचं कौतुक करावं तेवढं थोडंच... यानिमित्तानं अवयवदानाची संस्कृती मुंबई-महाराष्ट्रात रूजावी, असा आदर्श निर्मला सामंत प्रभावळकरांनी घालून दिलाय. त्यांच्या या दातृत्वाला झी मीडियाचा सलाम....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.