राजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल

राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2013, 10:32 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह गणेश नाईक, जयंत पाटील, सुनील तटकरे, नसीम खान, रामदास आठवले आदी आजी माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय आघाडी सरकारनं घेतला आहे. राजकीय नेत्यांचे पद आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका गृहित धरून गृह खात्यामार्फत झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते.
एकीकडे आघाडीच्याच नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आलीय. राज ठाकरेंना वायऐवजी आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. हे काय गौडबंगाल आहे, असं कोडं सर्वांनाच पडलंय. कारण यापूर्वी जेव्हा राज ठाकरेंची सुरक्षा कमी केली होती, तेव्हा त्यांनी सुरक्षाच नाकारली होती.
जवळपास ७-८ महिने खासगी बॉडीगार्डस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपासून राज ठाकरेंना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. सुमारे महिनाभरापूर्वी राज ठाकरेंनी टोलच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय आणि मुख्यमंत्री भेट यांचा राजकीय संबंध आहे का, अशी चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचे राजकीय महत्त्व वाढल्याचं हे लक्षण मानलं जातंय.
याउलट रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंची राजकीय पत कमी झाल्यानं त्यांची सुरक्षाही कमी करण्यात आलीय. त्यामुळं आठवले आणि आरपीआय कार्यकर्ते नाराज झालेत. आघाडीशी काडीमोड घेऊन सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आठवले शिवसेना-भाजप महायुतीत सामील झाले. महायुतीच्या दोघांच्या संसारातच खटके उडत असताना, त्यात आठवलेंची भर पडलीय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत आठवलेंना शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावर मानाचे स्थान दिले जात होते. परंतु आता त्यांना कुणीही कार्यक्रमांना बोलवत नाही. आठवलेंमुळे युतीला फारसा फायदा झालेला नाही.
उलट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. शिवाय राज्यसभेचे तुणतुणे त्यांनी लावून धरले आहेच. एकेकाळी जोरदार गर्जना करणा-या पँथऱच्या या चित्त्याला राज्यसभेसाठी सेना-भाजप नेत्यांचे जोडे झिजवावे लागतायत. एकेकाळच्या या झुंजार दलित नेत्यावर `कोण होतास तू, काय झालास तू...` अशी अवकळा आलीय. आठवलेंची सुरक्षा कमी करून आघाडी सरकारनंही त्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. अशा अवघड स्थितीत आता हा निळा पँथर काय करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.