'त्या' अघोरी शर्यतीची गंभीर दखल

सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावात अल्पवयीन मुलांना बैलगाडीला जुंपल्याचं वृत्त झी २४ तासनं प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची पोलीस खात्यानं गंभीर दखल घेतली आहे.

Updated: Apr 3, 2012, 11:41 AM IST

www.24taas.com, सांगली

 

सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावात अल्पवयीन मुलांना बैलगाडीला जुंपल्याचं वृत्त झी २४ तासनं प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची पोलीस खात्यानं गंभीर दखल घेतली आहे. बेडग गावातील स्पर्धा कुठलीही परवानगी न घेता भरवण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं असून सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्त्यांच्या सल्ल्यानुसार आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

 

बेडग स्पर्धेप्रकरणी बालकल्याण विभागामार्फत माहिती मागवण्यात आली असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीतीही पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तसंच कायद्याचं उल्लंघन होईल अशा स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.

 

सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावात लहान मुलांना बैलगाड्यांना जुंपून त्यांना शर्य़तीत पळवलं जातं. हायकोर्टानं बैलगाड्यांच्या शर्यतींवर सरसकट बंदी आणल्यानंतर बेडग गावातल्या लोकांनी आता लहान मुलांनाच बैलगाडीला जुंपायला सुरुवात केली. अगदी दहा -बारा वर्षांच्या मुलांना बक्षिसाच्या अमिषापोटी पळवलं गेलं. कोवळ्या मुलांना  बैलगाडीला जुपणाऱ्या महाराष्ट्राची वाटचाल आता तालिबानकडे झाली आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.