www.24taas.com, मुंबई
‘किंगफिशर’ला वाचवण्यासाठी विजय माल्या टाटा समूहाबरोबर चर्चा करत आहेत. झी २४ तासला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार याबाबत विजय माल्या यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली आहे. चर्चा झाल्याचं दोन्ही बाजूंकडून मान्य केलं जातंय, मात्र व्यवहार निश्चित झाल्याला अजून दुजोरा दिलेला नाही.
माल्या किंगफिशरचा शेअर १११ रुपयांपेक्षा कमी भावाला विकू शकत नाहीत. अन्यथा ज्या बँकांनी त्यांना कर्ज दिलंय त्या अडचणीत येतील. झी २४ तासला सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा संपुर्ण किंगफिशर एअरलाईन्स खरेदी करण्यात उत्सुक नाहीत. त्यांना एअरलाईन इन्फ्रास्ट्रक्टर, लायसेन्स आणि देशी आणि विदेशी उड्डाणांचा परवाना हवा आहे.
किंगफिशर एअललाईन्सच्या अधिकाऱ्यांनी विक्रीच्या चर्चेचं खंडन केलंय. मात्र सध्याच्या परिस्थितीत माल्यांपुढे विक्रीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याचं दिसतंय. किंगफिशरवर साडे सात हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.