गणपतीत रात्रभर `वाजवा रे वाजवा`

गणपतीत रात्रभर वाजवा रे वाजवाचा संदेश दिला गेला आहे. तशी परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच, कायद्याचेही भान राखण्याचा संदेश राज्य सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना दिला आहे .

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 12, 2012, 08:58 AM IST

www.24taas.com, मुंबई
गणपतीत रात्रभर वाजवा रे वाजवाचा संदेश दिला गेला आहे. तशी परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच , कायद्याचेही भान राखण्याचा संदेश राज्य सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना दिला आहे .
विसर्जन मिरवणुकीत रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजवू देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात रात्री दहानंतर लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही, असा दंडकही सरकारने घालून दिला आहे. या विसर्जन मिरवणुकांत रात्री १२पर्यंत डेसिबलच्या मर्यादेचे पालन करून लाऊडस्पीकर लावता येतील, मात्र मध्यरात्रीनंतर ढोल-ताशे , बाजा, झांज यासारखी पारंपरिक वाद्ये वाजविता येतील.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी सह्याद्री ​ अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, नसिम खान यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर या बैठकीस उपस्थित होते.
सुरक्षाविषयक सर्वप्रकारे खबरदारी घेऊन ध्वनिप्रदूषणाबाबतच्या सर्व कायद्यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवानगी देताना म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रात्री दहानंतर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास बंदी आहे. मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री १२पर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी शांतता क्षेत्रानुसार मिरवणुकीचा मार्ग ठरवला जाणार आहे.
विशेष बाब म्हणून सरकारने गणपती विसजर्नाच्या मिरवणुकीत रात्री १२पर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर पारंपारिक वाद्ये वाजविता येतील . जेथे शांतता क्षेत्र घोषित केले आहे अशा भागांतून मिरवणूक जाताना कायद्याचे उल्लंघन करू नका असे बजावण्यात आले आहे.
पुण्याच्या धर्तीवर मुंबईमध्येही वाद्यांना परवानगी दिल्याने मुंबईत बाप्पांना वाजतगाजत निरोप दिला जाईल. मुंबईतील गणेशमंडळाने पाच दिवस रात्री १२पर्यंत वाद्ये वाजविण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.