www.24taas.com,नवी मुंबई
गणपती मूर्ती तयार करण्यासाठी पेण प्रसिद्ध आहे. येथील गणेश मूर्ती देश-विदेशात नेल्या जातात. या ठिकाणी तब्बल ४५०कार्यशाळांमधून ११ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. यातून यावर्षी २० कोटीं रूपयांची उलाढाल झाली आहे.
पेणमध्ये हमरापूर, जोहे, विभागात प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून कच्चा मूर्ती बनविण्याचा मोठा व्यवसाय आहे. तर पेममधील प्रमुख पंचवीस कार्यशाळांमध्ये तब्बल तीन ते चार लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या ठिकाणच्या पाच ते दहा फूट उंचीच्या गणेशमूर्तीची ऑर्डर (न रंगविलेल्या) तीन महिने अगोदरच कर्नाटक, गुजरात, गोवा, तामिळनाडूत गेल्याची माहिती देण्यात आली.
कुंभारवाडा, कोंबडवाडा, गुरवआळी, कासारआळी, नदीमाळ नाका फणस डोंगरी, या ठिकाणी शहरात घरोघरी गणपती कार्यशाळा असून तब्बल सात लाख छोट्या व मध्यम साईजच्या गणेशमूर्ती रंगवून ग्राहकांना दिल्या जातात. गेल्यावर्षी १२ लाख गणेशमूर्ती पीओपी आणि काही प्रमाणात शाडूच्या मातीच्या तयार करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीची पेणच्या कार्यशाळेची उलाढाल सुमारे १५ कोटींच्या घरात होती. हा आकडा ३० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
१५० कार्यशाळा व पेण शहरातील ३०० कार्यशाळांमधून तब्बल १५ लाख गणेशमूर्ती तयार झाल्या आहे. यावर्षीची ४५० कार्यशाळांची उलाढाल २० कोटी रुपयांच्या आसपास आहे. या व्यवसायासाठी शासनाची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी पेणमधील मूर्तीकारांची आहे.