www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातलं गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक सोहळा नाही. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून एकूण बाजारात होणारी आर्थिक उलाढालही मोठी आहे. रस्त्यावरच्या किरकोळ विक्रेत्यापासुन मंडळांच्या मल्टीनेशनल प्रायोजकांपर्यंतच्या आर्थिक साखळीत सुमारे ३०० ते ४०० कोटींची उलाढाल या अवघ्या १० दिवसांत होते.
गणेशोत्सवादरम्यान मंडळाकडून गोळा केली जाणारी वर्गणी किवा भाविकांकडून स्वेच्छेनं दिली जाणारी देणगी ही एका मंडळाकडे किमान ३० हजार रुपये वर्गणी अथवा देणगीच्या स्वरुपात जमा होतेय. विविध कंपन्यांचे प्रायोजकत्व म्हणजेच मंडळाच्या मांडवामध्ये अथवा परिसरात लावण्यात येणारे बॅनर, होर्डिंग तसेच कमानींच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा ५० हजार ते ५० लाख रुपयापर्यंत असतो.अशा प्रकारचे हे आर्थिक स्त्रोत आहेत.
कुठल्याही एका मंडळाचा विचार केल्यास ही झाली जमेची अथवा उत्पन्नाची बाजू. मंडळाचे सर्व प्रकारचे खर्च या उत्पन्नावरच अवलंबून असतात.
-मांडवासाठीचा खर्च- २० हजार ते २० लाख रुपये
-देखाव्याचा खर्च- ४० हजार ते २० लाख रुपये
-रोषणाई आणि साऊंड सिस्टीम चा खर्च- २ लाख ते १० लाख रुपये
-ढोल तसेच विविध पथकांसाठीचा खर्च- १५ हजार ५ लाख रुपये
-सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवरील खर्च - १० हजार ते १० लाख रुपये
-गणरायाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीतील इतर खर्च- १० हजार ते ५ लाख रुपये
-पूजा, प्रसाद आदींवरील किरकोळ खर्च - १० हजार ते १ लाख रुपये
पुण्यामध्ये लहान मोठी अशी सुमारे ४५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. त्यामुळे एकुण विचार केला तर शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान ३०० ते ४०० कोटींची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी होते. व्यावसायिकांना रोजगार, जाहिरात आणि प्रसिद्धी, शासकीय महसूल, पर्यटन, हॉटेलिंग, वाहतूक यांसह अनेक घटक या उलाढालीशी निगडीत आहेत.
आर्थिक उलाढालीवर गणेशोत्सवाचा थाटमाट अवलंबून असतो. पैसा असला की कार्यकर्त्यांचा उत्साह तसेच गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र सध्या बाजारावर असलेलं मंदीच सावट, बॅनर तसेच कमानींवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घालण्यात आलेले निर्बंध आदिमुळे मंडळांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत.
स्थानिक स्वरूपाच्या निवडणूका असल्या की राजकीय पुढा-यांकडून मोठं आर्थिक पाठबळ मंडळांना लाभतं. पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा फारसा लाभ यावर्षी मंडळांना होताना दिसत नाहीये. असं असलं तरी गणेशोत्सवातील उत्साह दांडगा आहे. अगदी रस्त्यावरील फेरीवाल्या पासून बड्या व्यावसायिकांपर्यंत सगळ्यामध्ये चैतन्याचं वातावरण आहे… बाप्पाच्या आशीर्वादाने सारंकाही सुमंगल आहे… अवघी पुण्यनगरी गणेशोत्सवाच्या आनंदात चिंब आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.