`मौन` पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर टीका काही थांबेना!

राजकीय विरोधकांनंतर आता यूपीए सरकारला पुस्तकांनी घेरलंय. पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर आता  माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान आणि यूपीए सरकारचे वाभाडे काढले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 15, 2014, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजकीय विरोधकांनंतर आता यूपीए सरकारला पुस्तकांनी घेरलंय. पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर आता  माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान आणि यूपीए सरकारचे वाभाडे काढले आहेत. या पुस्तकारून पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं यूपीएच्या मंत्रीमंडळातील सहकायांवर नियंत्रण नव्हते का? यूपीएतील काही मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम करतात का? आणि त्याचवेळी मनमोहन सिंग गप्प बसून राहतात का? असे अनेक प्रश्न आम्ही नाही तर दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय म्हणून काम केलेले पंतप्रधानाचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनी लिहिलेल्या पुस्तकातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. संजय बारू यांच्या `अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर` या पुस्तकात मनमोहन सिंग हे रबर स्टँम्प झाल्याचं म्हटलं होतं. आता पारख यांच्या `क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर` या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातल्या कोळसा विभागातील अनेक गूढ उकलले आहेत.
 
`कॉन्स्पिरेटर ऑर क्रुसेडर` या पुस्तकात पारख म्हणतात... पंतप्रधान अशा सरकारचे प्रमुख होते ज्याच्यावर त्यांचे काहीच नियंत्रण नव्हते. पंतप्रधान यांना कोळसा ब्लॉकचे ओपन बिडिंग पाहिजे होते. मात्र, कोळसा खाण व्यापाऱ्यांना ते नको होते. त्यामुळे ओपन बिडिंग होऊ शकले नाही. मनमोहन सिंग प्रामाणिकपणे काम करत होते. मात्र, सरकार आणि पक्षातील काही स्वार्थी लोकांना ते विरोध करू शकत नव्हते. कोळसामंत्री शिबू सारेन आणि दासारी राव यांच्याकडून ओपन बिडिंगवर वारंवार अडचणी वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग एकदाही बोलले नाहीत.
 
काही खासदार आएएस अधिकाऱ्यांचा अपमान करतात, असे आपण पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. याला पंतप्रधानांनीही दुजोरा देत आपल्यालाही कटू अनुभव येत असल्याची कबुली दिली.
पारख यांच्या पुस्तकातील अनेक गौप्यस्फोटांमुळं सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याविरोधात विरोधकांच्या हातात आयतं कोलित मिळालंय. पुस्तकाच्या प्रकाशनचं टायमिंग आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा पुढं करत काँग्रेसनं बचावत्मक भूमिका घेतलीय. पण, काँग्रेस काहीही दावे करत असली तरी पंतप्रधानांचे निकटवर्तीयच त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्यामुळं ऐन निवडणुकीत काँग्रेची मोठी अडचण झालीय एवढं मात्र खरं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.