www.24taas.com, मुंबई
ठाण्यात सेनेले सत्तास्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आता त्यांचे भाऊ आणखी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सरसावले आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात मनसेने सेनेला पाठिंबा दिल्यानंतर स्पष्ट केले की, जर नाशिकमध्ये मनसेला सत्तास्थापनेसाठी गरज असल्यास शिवसेना त्यांना मदत करेल.
मनसेने नाशिकमध्ये सत्तास्थापनेसाठी संपर्क साधल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून मनसेला पाठिंबा शिवसेना देऊ शकते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही 'ठाकरे पॅर्टन' येणार का? हे पाहण ं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमध्ये मॅजिक फिगर ६२ आहे.
४० जागेवर विजय मिळवित राज ठाकरे यांचा मनसे पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला मात्र सत्ता स्थापनेसाठी त्यांना ६२चा अकरा गाठवा लागणार आहे. नाशिकमध्ये सेनेचे १९ नगरसेवक तर आरपीआयचे ३ नगरसेवक असल्याने मनसेला सेनेच्या साथीने सत्ता स्थापन करता येईल.
ठाण्यात सेनेच्या सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या आमदारांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता मनसे शिवसेनेशी संपर्क साधून नाशिकमध्ये सत्ता स्थापन करणार का? की शिवसेनेला दूर ठेऊन भाजपच्या साथीला जाणार हे पुढील काही काळात स्पष्ट होईलच.