निकाल 'राज' विरोधी, सभा आता घेणार कधी?

शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Updated: Feb 9, 2012, 04:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मनसेचा शिवाजी पार्कसाठीचा सुप्रीम कोर्टातला लढाही अयशस्वी ठरला आहे.

 

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराची समारोप सभा नक्की कुठं घेणार हा प्रश्न अजूनही आहेच. त्यामुळे आता राज ठाकरे कोणत्या मैदानावर सभा घेणार हे देखील महत्त्वाचं आहे. शिवाजी पार्कमध्ये प्रचारसभा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई दिल्लीत दाखल झाले होते. मुंबई हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यावर राज ठाकरेंनी हायकोर्टानं दिलेल्या निकालाच्या हेतूबाबतच शंका घेत, सुप्रीम कोर्टात निकालाला आव्हान दिलं होतं.

 

तसंच कोर्ट पक्षपाती असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. हायकोर्टानं निर्णय देऊन पाच दिवस झाले. सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी कोर्टाची सही आवश्यक असतं मात्र, हायकोर्टाकडून सहीच करण्यात आलेली नव्हती. यामागे कोर्टाचा काही वेगळा उद्देश आहे का? असा सवालही राज यांनी उपस्थित केला होता. शिवाजी पार्कवर सभा घ्यायला कोर्टानं परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना भवनसमोरच्या गडकरी चौकात सभा घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली.

 

मात्र, वाहतुकीच्या कोंडीचं कारण देत पोलिसांनी सभेची परवानगी नाकारली, तर पोर्तुगीज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्याची तयारी दाखवली. गडकरी चौकात वाहतुकीचं कारण दाखवून सभेला परवानगी नाकारत असलेले पोलीस पोर्तुगीज चर्च चौकात परवानगीची तयारी कसे दाखवतात, असा सवाल आता मनसेकडून विचारला जात आहे.