www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!
हा प्रकार घडला तो बुधवारी औरंगाबादमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या सभेमध्ये... स्त्री प्रबळीकरणाच्या नावाखाली मतांचा जोगवा मागणाऱ्या राहुल गांधींना, आपलं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं नावंही उच्चारता आलं नाही.... आणि भर सभेत त्यांनी ज्योतिबा फुले यांचा उल्लेख `ज्योतिबाई फुले` असा केला.
`शात्रपती शिवाजी महाराज, शात्रपती साहूजी महाराज, ज्योतीबाई फुले और आंबेडकरजी की धरती पे आपनें मेरा प्यार से स्वागत किया, दिल से स्वागत किया इसलिए मैं आभारी हूँ` असं म्हणत राहुल गांधींनी उपस्थितांचे आभार मानले.
महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्या या भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. परंतु, यापैंकी कुणीही राहुल गांधींची चूक सुधारली नाही किंवा त्यांच्या ध्यानात आणून देण्याचं धाडसंही दाखवलं नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.