www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.
मतदान केंद्रावर कमळाचे चित्र रेखाटल्याबद्दल आक्षेप घेतलाय. तसेच याबद्दल निवडणूक आयोगानेही लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन निवडणुकांत मतदानादिवशी अमेठीकडे ढुंकूनही न पाहणारे राहुल गांधी यंदा पहिल्यांदा अमेठीत पहाटेपासून मतदारांना भेटताना दिसत होते.
अमेठीतील फुलवा गावातील एका शाळेतील मतदान केंद्रावर तेथील मतदानकक्षातील वर्गातील फळ्यावर कमळाचे चित्र खडूने रेखाटण्यात आल्याचे राहुल गांधींच्या लक्षात आले. यावर आक्षेप नोंदवत याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदविल्यानंतर निवडणूक आयोगाने तत्काळ सर्व मतदान केंद्र म्हणून नेमण्यात आलेल्या शाळांतील अशाप्रकारची निवडणूक चिन्हे दिसल्यास ती झाकून किंवा काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.