www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून तांत्रिक चुका झाल्यामुळं मुंबईतील तीन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा चार मतदानकेंद्रावर रविवारी शांततेत फेरमतदान झालं. राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय.
मुंबईतील तीन मतदानकेंद्रावरील मतदानाची एकूण सरासरी ४८.९४ टक्के आहे. सकाळी सात वाजल्यापासून फेरमतदानाला सुरुवात झाली. मात्र रविवारच्या सुट्टीमुळे मतदारांनी फेरमतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.
मुंबईतील कांदिवली, चांदिवली, मालाड आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या चार मतदान केंद्रावर फेरमतदान झालं. एकूण २ हजार ५१७ मतदारांपैकी एक हजार २३२ मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क `पुन्हा` बजावला. त्यात पुरुष मतदारांची संख्या ६६८ तर महिला मतदारांची संख्या ५६४ आहे.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील २४२ क्रमांकाच्या केंद्रावर एकूण ३५१ मतदारांनी (३५.४१ टक्के) फेरमतदान केलं. चारकोप विधानसभा मतदारसंघातील २४३ क्रमांकाच्या केंद्रावर एकूण ६२२ मतदारांनी (५८.५१ टक्के) फेरमतदान केलं तर, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चांदिवली विधानसभा मदारसंघातील १६० क्रमांकाच्या केंद्रावर २५९ मतदारांनी (५५.९३ टक्के) मतदान केलं, अशी माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांनी दिली.
तर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर ६४.४४ टक्के फेरमतदान झाल्याचं सांगण्यात आलंय.
प्रत्यक्ष मतदानाआधी यंत्रांची चाचणी घेतली जाते. या चार भागातील केंद्रांवर चाचणीसाठी घेण्यात आलेलं मतदान डिलीट करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं झालेल्या मतदानापैंकी जास्त मतदानाची आकडेवारी या मतदानकेंद्रातून सामोरं आली होती. हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.