सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे

सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.

Updated: Apr 13, 2014, 01:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला. कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परीषदेत सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केले.
निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी शाही इमामांना भेटतात. त्यांच्याकडे धर्मनिरपेक्ष मतांसाठी आवाहन करतात. पण त्यांची मते धर्मनिरपेक्ष आणि आमची जातीयवादी हे कसे होऊ शकते. आम्हाला मिळणारी मतं ही जातीयवादी कशी होऊ शकतात. निवडणूकीनंतर देशात पंतप्रधान कोण होणार हे आता इमाम ठरवणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पूढे म्हणाले, "लोकसभेची निवडणूक ही देशातील प्रमुख मुद्द्यांवर लढली जाते. शिवसेना ही देशातील सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही. तर देशद्रोही मुस्लिमांच्या विरोधात आहोत. देशात ओवेसीसारखा माणूस पंधरा मिनिटांसाठी देश आमच्या ताब्यात द्या आणि पोलिसांना बाजूला करा. सगळ्या हिंदूंना संपवण्यासारखी भाषा करतो. हे कसे चालते? शाही इमाम देशात मतदानाविषयी फतवा काढतात. हे कसे चालते? हे शिवसेनेला मान्य होणार नाही. अजमेर शरीफांच्या दिवाणांचा आम्हाला अभिमान वाटतो. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली, त्यावेळी "वतन का दुश्‍मन दोस्त नही होता` असे फटकारत त्यांचे स्वागत करण्याचे राष्ट्रप्रेमी दिवाणांनी नाकारले. एवढेच नव्हे तर ज्या रस्त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान गेले तो रस्ताही धुतला. देशाला अशा मुस्लिमांची गरज आहे.`` असे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल आपले मतं स्पष्ट केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.