www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
दक्षिण मुंबई
दक्षिण मुंबईत काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, शिवसेनेचे अरविंद सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर आणि आपच्या मीरा संन्याल असा चौरंगी सामना आहे. सेना-मनसेच्या मतविभागणीत 2009 साली ही जागा शिवसेनेला गमवावी लागली होती. यावेळीही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तरीही परिस्थिती देवरांना खुपच अनुकुल आहे असं नाही. लालबाग परळ आणि गिरगांव भागात रहाणारा पारंपारिक शिवसेनेचा मतदार अरविंद सावंतांच्या मागे उभा राहिल्यास चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण मध्य मुंबई
काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ अशी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघांची ओळख. काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि मनसेचे आदित्य शिरोडकर असा तिरंगी सामना इथं आहे. यावेळी सेनेने नव्या दमाचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिलीय. राज ठाकरेंचं निवासस्थान आणि मनसेची ताकद असलेलं दादर याच मतदारसंघात येतं. इथुन आदित्य शिरोडकर जेवढी मतं घेतील तेवढं शिवसेनेला नुकसान होणार हे स्पष्टच आहे.
उत्तर मध्य मुंबई
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ देखील काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसच्या प्रिया दत्त इथून हॅटट्रीक करणार का याबाबत उत्सुकता आहे. सुनील दत्त यांच्यापासून हा मतदारसंघ दत्त घराण्याच्या ताब्यात आहे. यावेळी प्रिया दत्तना आव्हान दिलंय भाजपच्या पूनम महाजन आणि समाजवादी पार्टीचे फरहान आझमी यांनी... मतदारसंघात बहुसंख्येने असलेले मुस्लिम मतदार काँग्रेसच्या बाजूने राहणार की समाजवादी पार्टीबरोबर, याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस नेते नसिम खान आणि कृपाशंकर सिंग यांच्या नाराजीचा फटका प्रिया दत्त यांना बसू शकतो, अशी चर्चा आहे.
उत्तर पश्चिम मुंबई
उत्तर पश्चिम मुंबईत 2009 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले होते. मात्र यावेळी मनसेने शालिनी ठाकरेंऐवजी सिने अभिनेते महेश मांजरेकर यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन कीर्तिकर आणि मनसेचे महेश मांजरेकर अशी तिरंगी लढत इथं रंगणार आहे. यावेळी मराठी मतदार शिवसेनेला कौल देतात की, पुन्हा सेना-मनसे मतविभागणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उत्तर मुंबई
उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे संजय निरुपम विरूद्ध भाजपचे गोपाळ शेट्टी अशी थेट लढत आहे. 2009 मध्ये तिरंगी लढतीत काँग्रेसचे संजय निरूपम यांनी बाजी मारली होती. मात्र यावेळी समीकरणं बदललीत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असलेला गुजराती मतदार नरेंद्र मोदी लाटेमुळे भाजपाच्या मागे एकगठ्ठा उभा राहण्याची शक्यता असल्याने हा मतदारसंघ भाजपासाठी काहीसा सकारात्मक असल्याचं चित्र आहे.
ईशान्य मुंबई
ईशान्य मुंबईत गेल्यावेळीप्रमाणे यंदाही तिरंगी रंगणार आहे. गेल्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा राष्ट्रवादीचे संजय दिना-पाटील यांना झाला होता. यावेळी इथं मनसेनं आपला उमेदवार दिलेला नाही. पण तरीही राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील, भाजपाचे किरीट सोमय्या आणि आम आदमी पार्टीच्या मेधा पाटकर यांच्यात लढत आहे. इथल्या झोपडपट्ट्यांमधील राष्ट्रवादीची मतं यावेळी मेधा पाटकरांकडे वळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठी मतं कुणाच्या पारड्यात पडणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.