कोण म्हणंत आघाडीत बिघाडी..?

महेश तपासे राणे-जाधव यांच्या वादामुळे आघाडीचे विरोधक भलतेच खूश झाल्याचे दिसून येत आहे.. आज अनेक ठिकाणी अश्या वावट्य़ा उठल्या आहेत की, आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.

Updated: Nov 9, 2011, 07:43 AM IST

महेश तपासे, प्रवक्ते, ष्ट्रवादी काँग्रेस

 

राणे-जाधव यांच्या वादामुळे आघाडीचे विरोधक भलतेच खूश झाल्याचे दिसून येत आहे.. आज अनेक ठिकाणी अश्या वावट्य़ा उठल्या आहेत की.. आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्यावं की आज आम्ही राज्यात सत्तेत एकत्र आहोत.

 

भास्कर जाधव हे एक अत्यंत जबाबदार असे कोकणातील नेते आहे, ज्यावेळेस त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली तेव्हा खुद्द भास्कर जाधव हे पवार साहेबांच्या भेटीसाठी आले होते. तोडफोड झाल्याचे कळताच अनेक सामान्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यास सुरवात केली. पण जेव्हा ही गोष्ट भास्कर जाधव यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ रस्ता मोकळा करण्यास सांगितले, कारण की सामान्य लोकांना झळ पोहचू नये हाच त्यांचा हेतू होता.

 

आघाडी हे काही परस्परांचे शत्रू नाहीत, तर आघाडीचे खरे शत्रू आहेत ते म्हणजे शिवसेना आणि भाजपा हेच. कारण की सध्या त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. आज कोकणात अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांचं  वजन हे कोकणात वाढत असल्याने अनेकांचे डोळे नक्कीच विस्फारले आहेत.

 

या वादात भास्कर जाधव यांनी अत्यंत तारतम्य राखूनच वागले आहेत. तोडफोड झाल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांना थंड राहण्यास त्यांनी सांगितले होते. परंतु काही वेळेस काँग्रेसमध्ये शिवसेनेतून आलेल्या लोकांना अजूनही शिवसेनेची प्रवृत्ती ही कायम ठेवली आहे का? अशी शंका मात्र नेहमी येते.

 

कोकणाचा विकास करण्याचे स्वप्न हे भास्कर जाधव यांचे आहे, तसेच ते जिथून जिंकून आले तो खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला. कारण की खुद्द विरोधी पक्षाचे नेते रामदास कदम यांना धुळ चारली आहे. त्यामुळेच भास्कर जाधव हा अत्यंत कडवा नेता आहे असे दिसून येते. पण तरीही या छोट्याश्या गैरसमजामुळे विरोधकांनी जास्त खूश होऊ नये. हे त्यांनी लक्षात ठेवावं