गेस्ट ब्लॉग :`सेट` युवर करिअर!

सेट डिझायनिंग हे करिअर म्हणून खरोखरच आकर्षक, कष्टाचं पण पैसा आणि नाव मिळवून देणारं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे समाधान देणारं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 03:36 PM IST

राकेश हांडे, दीपक येरुणकर
सेट डिझायनर्स
सेट डिझायनिंग हे करिअर म्हणून खरोखरच आकर्षक, कष्टाचं पण पैसा आणि नाव मिळवून देणारं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे समाधान देणारं आहे. यंदाचा गणपती उत्सव आमच्यासाठी वेगळा ठरला. यंदा अंधेरीच्या राजाला आण्ही रांजणगावचं मंदिर तयार केलं, तर परळ लाल मैदानाच्या गणपतीला भीमाशंकरचं मंदिर आम्ही बनवलं. तसंच ग्रँट रोडला लोढा फाऊंडेशनसाठी ५ एकरच्या जागेत भव्य सजावट केली. पालीचं मंदिर निर्माण केलं. हिमालय उभा केला. तसंच दहा आंतरराष्ट्रीय मंदिरंही या सजावटीत आम्ही उभारली. उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र देशा’ हे प्रदर्शन या सजावटीत होतं आणि 3 डी फोटोग्राफी प्रदर्शनही भरवलं. आम्ही केलेल्या सजावटीचं सगळीकडे कौतुक झालं. याबद्दल खरंच आम्हाला आनंद होतोय. एवढं भव्य काम आम्ही प्रथमच केलं. या तिन्ही प्रकल्पांचं बजेट सुमारे १ कोटी रुपये एवढं होतं आणि हे तिन्ही प्रकल्प आम्ही अवघ्या महिन्याभरात पूर्ण केले. या गोष्टीमुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. ही सजावट करण्याचं समाधानच काही और असतं. आम्ही मुंबईतलेच, लालबागमधले...

घरची परिस्थिती बेताचीच होती. कार धुण्याची कामं करून मिळणाऱ्या पैशांतून आम्ही कॉलेजची फी भरत होतो. पण भविष्यात काहीतरी वेगळं आणि भव्य करण्याची इच्छा लहानपणापासून होती. जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर आम्ही `बियाँड द लाईन` ही इव्हेंट एजन्सी तसंच कला दिग्दर्शनाची कंपनी स्थापन केली. कामं बरीच करत होतो, पण थेट संपर्कातून नाही. त्यामुळे अनुभव मिळत होता, पण नाव नाही... आज आमची स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. गणपतीच्या सजावटीपासून सुरूवात केल्यानंतर कालांतराने आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्सकडे वळलो. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांचं सेट डिझाइन आम्ही केलं. झी टीव्हीच्या मात्र अनेक मालिका आणि रिअलिटी शोचे सेट आम्ही डिझाईन केले आहेत. फू बाई फू, खुपते तिथे गुप्ते, एका पेक्षा एक, उंच माझा झोका या कार्यक्रमांमध्ये दिसणारे सेट आम्हीच निर्माण केले आहेत. आज आमच्या हाताखाली ५० जण काम करत आहेत. अर्थात यासाठी गेली १५ वर्षं आम्ही खूप मेहनत घेतली आहेच, पण मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आम्हाला खंबीर साथ दिली. त्यातूनच आम्ही इथवर पोहोचू शकलो. आमच्याप्रमाणेच अनेक मराठी माणसांनी या क्षेत्रात उतरून नाव कमवावं अशी आमची इच्छा आहे.

या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्ञान मिळवण्यासोबतच क्रिएटिव्हीटीला आव्हान देणाऱ्या अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात आणि त्यातून तुमच्या कलाकृती अधिकाधिक संपन्न होत जातात. गणपती मंडळातील सजावटीपासून ते मालिकांधील सेट डिझाइनपर्यंत आणि कॉर्पोरेट इव्हेंट्सपर्यंत अनेक संधी आहेत. आम्ही अनेक आऊटडोर लग्नांचीही सजावट केली आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट इव्हेंटचीही सजावट केली आहे. खरंतर कॉर्पोरेट इव्हेंट्सची बजेट्स मोठी असतात, तिथे एका अधिकारी व्यक्तीशी बोलणं झाल्यावर कामाचा अंदाज येतो. याउलट गणपती मंडळात काम करताना १० कार्यकर्ते वेगवेगळे विचार आणि विषय मांडत असतात, गोंधळ घालत असतात. त्यांच्यात professionalism अर्थातच कॉर्पोरेटपेक्षा कमी असतो. मात्र तरीही गणेश मंडळांसोबत काम करायला मजा येते. ते काम आम्ही जास्त एंजॉय करतो. पैसा दोन्ही क्षेत्रात मिळतो. आज आम्ही कमवत असलेल्या पैशातून अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही आम्ही घेतली आहे.
Artist हा नाव कमावण्यासाठी असतो, पैसा कमावण्यासाठी नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. इतर अनेक क्षेत्रं आहेत, ज्यात पैसा मिळतो पण नाव नाही. मात्र कलाक्षेत्र याला अपवाद आहे. कलाकाराने आधी नाव कमवावं. पैसा त्यापाठोपाठ येतो. आज अनेक शिकाऊ मुलं आमच्याकडे येतात. त्यांनी चांगलं कलाकार बनावं आणि यशस्वी व्हावं, अशीच आमची इच्छा असते. मात्र ती मुलं आपल्या ज्ञानात वाढ व्हावी याबद्दल कमी उत्सुक असतात. किती पैसे आपल्याला मिळणार आहेत, यामध्येच त्यांना इंटरेस्ट असतो. पैसे मिळणारच आहेत. मात्र जर तुम्ही चांगले कलाकार बनू शकला नाहीत, तर कलाक्षेत्रात तुमची वाढ होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. अनेकांनी या ७त्रात येऊन मोठं व्हावं असंच आम्हाला वाटतं. यासाठी आम्ही अनेक कार्यशाळा घेतो, तसंच इच्छुकांना आम्ही आमच्यासोबत काम करण्याची संधीही देतो