भरत दाभोळकर
अॅड-गुरू
‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध अॅड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!
जाहिरातीच्या जगाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जाहिरात कलेचं आता रितसर प्रशिक्षण भारतात सुरू झाल्यामुळे अनेक ट्रेन्ड अॅडव्हर्टायझर अॅड-वर्ल्डमध्ये दाखल झाले आहेत. मराठी मुलांची संख्याही या क्षेत्रात वाढत आहे. मराठी तरुण जाहिरातीच्या जगात आपला ठसा उमटवत आहेत. मराठी माणूस मुळातच प्रचंड क्रिएटिव्ह आहे. टॅलेंटच्या बाबतीत मराठी माणूस इतररांपेक्षा सरस आहे. पण, तरीही जाहिरात क्षेत्रात मराठी माणसाचं ‘डॉमिनेशन’ का नाही?
आज जाहिरात क्षेत्रात एक प्रमुख आव्हान असतं ते तुमचा टार्गेट ग्रुप ओळखण्याचं. आपण जाहिरात कुणासाठी बनवतोय, हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं असं, की जाहिरातदार आणि त्यांचे क्लायंट्स हे एवढे श्रीमंत, हाय-फाय असतात, की आपल्या व्यतिरिक्त भारतात मध्यमवर्गीय, सामान्य लोक राहातात, हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. मर्सिटिजमधून फिरत असताना किंवा एखाद्या मोठ्या क्लबमध्ये बसून जाहिराती डिझाइन केल्या जातात आणि त्यात देशभरातल्या जनतेला डोळ्यांसमोर ठेवल्याचा आव आणला जातो. पण, तुम्हाला जाहिरात करायची असेल, एखाद्या अशा उत्पादनाची जिचा ग्राहक सातारा-सांगली ते यूपी, बिहारमधल्या गावांमध्ये आहे. तर, तुम्ही त्याच्या भावना जाणून घेणार कशा? बस, ट्रेनने प्रवास करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती मर्सिडीजमध्ये बसून नाही डिझाइन करता येत, हे समजलं पाहिजे.
जाहिरात क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पार्ट्या, गलेलठ्ठ पगार असं वाटतं. पण, त्यासाठी मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही. मराठी तरूण टॅलेंटेड असूनही तो मागे का राहतो? इथे भाग असतो तो आत्मविश्वासाचा. जाहिरात क्षेत्रातलं हाय-फाय इंग्लिश पाहून बऱ्याच जणांना भीती वाटते. पण, त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिलं इंग्लिश वाक्य बोललो होतो. मला इंग्लिश बोलताना जेव्हा अडायला व्हायचं, तेव्हा मी सरळ त्यात मराठी किंवा हिंदी शब्द घुसडायचो. पण, पुढे हिच भाषा लोकांना पसंत पडली. तिला ‘हिंग्लिश’ म्हटलं जाऊ लागलं. क्रिएटिव्हिटीला भाषेचं बंधन नसतं. भारतीय लोकांसाठी आपण अॅड बनवत असतो. भारतीय लोकांची भाषा इंग्रजी नाही. एक अॅड इंग्लिशमध्ये लिहून ती नंतर चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतरासाठी दिली जाते. पण, याउलट ती एखाद्या भारतीय भाषेत लिहूनही नंतर इंग्रजीत ट्रांसलेट करता येऊ शकते ना! आज भारतीय जाहिरात क्षेत्रात जे दिग्गज मानले जातात, ते कमलेश पांडे, पियुष पांडे, प्रसून जोशी ही मंडळी हिंदीमध्ये शिकली होती. त्यांनाही इंग्रजीचं ज्ञान सुरूवातीपासून नव्हतं. पण तरीही हे हिंदी भाषक जाहिरातींवर देशी छाप पाडून मोठे झालेच ना! मग मराठी माणूस का आपल्या भाषेमुळे मागे राहतोय? जाहिरात क्षेत्रात येण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यक नाही. मात्र, जर तुम्हाला इंग्लिश येत असेल, तर तुम्हाला वेगळा आत्मविश्वास मिळतो. अमराठी क्लायंट इंग्रजीत जेव्हा ब्रीफ देतो, तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं. यासाठी तरी इंग्लिश शिकावंच.
आज जाहिरात क्षेत्रांमध्ये आर्ट डिरेक्टर, व्हिज्युअलायझर यांसारख्या मोठ्या पोस्टवर मराठी लोकांचं अधिराज्य आहे. कमर्शियल आर्टिस्ट्स हे बहुतेकवेळा मराठीच असतात. जे जे स्कूल ऑफ आर्ट, रचना सांसद सारख्या कॉलेजांमधून अनेक टॅलेंटेड, क्रिएटिव्ह मराठी तरुण/ तरुणी जाहिरात क्षेत्रात येतात आणि आपलं स्थान निर्माण करतात. पण... मॅनेजरिअल पोस्टसाठी हे लोक प्रयत्न करत नाहीत. मराठी माणसाचा मुळातच प्रॉब्लेम असा असतो, की सेटल झाले की ते समाधानी होतात. आपल्या कम्फर्ट झोन पलिकडे जाऊन चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करायला ते घाबरतात. मॅनेजरिअल पोस्टसाठी मराठी माणसं प्रयत्नच करत नाहीत! तिथे सगळे अमराठी लोक पाहायला मिळतात. त्यामुळे जाहिरात क्षेत्रामध्येही मराठी माणसांच्या डोक्यावर अमराठी लोक बसलेले दिसतात. हे चित्र बदलणं मराठी मुलांच्याच हातात आहे.
नुसत्या मुंबईत तीन हजारांच्या आसपास अॅड एजन्सीज आहेत. मराठी प्रतिभेला इथे चांगला वाव आहे. आज विविध ठिकाणी मराठी माणसाने आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात क्षेत्रातही तितक्याच दिमाखात मराठी प