Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2024, 08:39 AM IST
Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...' title=
कोर्टाच्या निर्देशानुसार छापली जाहिरात

Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टाने बुधवारी अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिल्यानंतर आज ही जाहिरात छापून आली आहे. वर्तमानपत्रात मराठी भाषेत घड्याळ चिन्हाबाबत निर्णय न्यायप्रविष्ट असल्याविषयीचा मजकूर 36 तासात प्रसिद्ध करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. त्याप्रमाणे अनेक मुख्य वृत्तपत्रांमध्ये अजित पवारांच्या पक्षाने पक्ष चिन्हाबद्दल स्पष्टीकरण देणारी जाहिरात छापली आहे. 

नेमकं घडलं काय?

राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह कोणाचं यावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान डिस्क्लेमरबाबत कोर्टाकडून विचारणा करण्यात आली. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे असं अजित पवारांच्या पक्षाच्या वकिलांनी सांगितलं. तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का? अशी विचारणा कोर्टाने केली. दररोजच्या नाही मात्र कॉमन ठिकाणी डिस्क्लेमर दिला आहे असं यावेळी अजित पवारांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं. अजित पवारांच्या वकिलांकडून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करतो आहे असा दावा करण्यात आला असता, शरद पवारांकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला.

शरद पवार यांचे वकील प्रांजल अगरवाल यांनी अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा केला. अजित पवारांच्या स्वतःच्या मतदारसंघात घड्याळ चिन्हासोबत मजकूर छापत नाहीत असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. अनेक ठिकाणी शरद पवार यांचा जुना फोटो, जुने व्हिडिओ अजित पवार यांच्या पक्षाकडून दाखवले जात आहेत. हा प्रचार पूर्ण चुकीचा आहे. मागच्या सहा महिन्यांपासून डिस्क्लेमरबाबत त्याच्याकडून सूचना पाळली जात नाही असाही आरोप करण्यात आला. यावर सुप्रीम कोर्टाने पुढील 36 तासात वृत्तपत्रात डिस्क्लेमर छापण्याचा आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिला होता. त्याप्रमाणे आता डिस्क्लेमर छापण्यात आला आहे.

नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

आज छापलेल्या जाहिरातीमध्ये काय?

या जाहीरातीमध्ये वरील बाजूला नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी असं लिहिलेलं आहे. त्याच्या एका बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असं लिहून अजित पवारांचा फोटो असून दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचं पारंपारिक पक्ष चिन्ह असलेलं 10 वाजून 10 मिनिटांची वेळ दर्शवणारं घड्याळाचं चिन्ह दिसत आहे. तसेच या जाहिरातीमध्ये पुढे, "भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला 'घड्याळ' हे चिन्हं दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्याय प्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या आधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे," असा मजकूर छापला आहे. या मजकुरामधील 'घड्याळ' हा शब्द इतर शब्दांपेक्षा वेगळ्या म्हणजेच लाल रंगात छापण्यात आला आहे. 

प्रतिज्ञापत्र सादर करणार

आता कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे अजित पवारांचा पक्ष आज छापलेल्या जाहिरातीसंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करेल. त्यानंतर या प्रकरणात पुढील सुनावणी होईल.