दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा

मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर माणूस दीर्घायुष्य जगू शकतो.

Updated: Feb 7, 2016, 12:58 PM IST
दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा title=

मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर माणूस दीर्घायुष्य जगू शकतो. निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे पौष्टिक आहार. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जंक फूड्स खाणे वाढल्याने विविध आजारांचेही प्रमाण वाढू लागलेय. या आजारांना दूर ठेवायचे असल्यास जेवणात विविध पालेभाज्या, कडधान्ये, मोसमी फळे, सुका मेवा यांचा समावेश करणे गरजेचे असते. आपल्या दीर्घ आणि सुदृढ आयुष्यासाठी या पदार्थांचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करा.

१. हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या खाणे फार उत्तम असते कारण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात सत्व असतात. हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज फार कमी असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही नसतो. हिरव्या भाज्या डोळ्याच्या दृष्टीसाठीही खूप उपयुक्त असतात. यातील काही घटक कर्करोगालाही दूर ठेवण्यास मदत करतात.

२. कडधान्ये
कडधान्ये भूक भागवण्यास फार मदत करतात. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठीही कडधान्ये मदत करतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी कडधान्यांतील फायबर उपयुक्त असते. आठवड्यात किमान दोनदा जेवणांत कडधान्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

३. कांदा
कांद्यासोबतच, कांद्याची पात, लसूण यांसारख्या पदार्थांचा आहारातील समावेश रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे मधुमेहासारख्या आजारांवरही कांदा फार गुणकारी आहे. कांद्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तो बारीक कापून, ठेचून किंवा खूप वेळेस चावून खाणे गरजेचे आहे.

४. मशरुम
मशरुमना सूपर फूड म्हटलं जातं. यातील अनेक घटक आपल्या शरीरातील जनुकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात. कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबवण्यासही बऱ्याच प्रमाणात मदत करतात.

५. बेरी
बेरी हे फळ आरोग्यासाठी सर्वात चांगले. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, ब्लॅकबेरीज या फळांमध्ये शर्करेचे प्रमाण कमी असते पण त्यात जीवनसत्वे मात्र मोठ्या प्रमाणात असतात. हृदयाचे विकार, कर्करोगाचा धोका, मधुमेहाचा धोका यांपासून ही फळे मोठ्या प्रमाणात संरक्षण करतात.

६. फळांच्या बिया आणि ड्रायफ्रूट्स
बिया आणि ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्याचप्रमाणे त्यात खनिजेही असतात. यामुळे विविध फळांच्या बीया आणि ड्रायफ्रूट्स खाणे शरीरासाठी फायद्याचे असते.