www.24taas.com , झी मीडिया,मुंबई
संधिदाह आजार जितका जुना होत जाईल तितकेच त्यामुळे होणाऱ्या वेदनांचे प्रमाण वाढत जाते. जर लहान वयात हा आजार झाला तर वाढत्या वयानुसार संधिदाह हा अधिकाधिक वेदनादायी होतो. सांध्यांजवळचे हाड आणि अस्थिंवरील मृदु पेशींचे आवरण यांच्याजवळ होणाऱ्या वेदना असा हा आजार पासष्टीनंतर सुरू होतो.
मात्र, अलिकडे या आजाराने पीडित असलेल्या रूग्णांची वयोमर्यादा तरूण वयोगटापर्यंत येऊन पोहोचली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, स्थूलपणा, पोषणाचा अभाव यासारख्या काही कारणांचा समावेश होत असल्याची माहिती एशियन ऑर्थोपेडिक इन्स्टिट्युटचे ऑर्थोपेडिक सर्जन आणि सांधेबदल (जॉईंट रिप्लेसमेंट) विषयक सल्लागार डॉ.सूरज गुरव यांनी दिली.
ऑर्थरायटिस केअर अॅण्ड रिसर्च नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिकषांनुसार स्थूलपणा आणि संधिदाह यांचा खूप जवळचा संबंध आहे. अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की बॉडी मास इंडेक्सनुसार (बीएमआय) गरजेपेक्षा अधिक वजन असलेल्या, लठ्ठ व्यक्तींमध्ये संधिदाह या आजाराचे निदान होण्याचे प्रमाण कमी बीएमआय असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक आहे. संधिदाहाने आजारी असलेल्यांपैकी ६६ टक्के रूग्ण हे गरजेपेक्षा अधिक वजन असलेले दिसून आले आहे.
भारतीय रूग्णांमध्ये संधिदाह या आजाराचे सर्वाधिक प्रमाण गुडघ्यामध्ये आणि त्याखालोखाल कमरेलगतच्या हाडांमध्ये आढळते. संधिदाह या आजाराविषयी लक्षणे-
वेदना
कडकपणा
सूज (कधीकधी)
सांधे दुमडताना त्रास होणे.
आजाराचे लवकर निदान आणि त्यावर त्वरेने उपचार या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. हा आजार जितका अधिक काळ राहील तितकीच सांध्यांची हानी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे निदान झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर उपचार करून घेणे रुग्णाच्या हिताचे ठरते.
शरीराचे वजन योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्या. सांधे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या. अपघात, जखम किंवा अतिवापर यामुळे सांध्यांलगत दुखापत झाल्यास पुढे जाऊन अस्थि-संधिदाह हा आजार बळावण्याची शक्यता वाढते. यासाठी सांध्यांवरील स्नायुंचे वेष्टन मजबूत राहण्याकरिता प्रयत्न केल्यास सांध्यांना दुखापत होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
नियमितपणे शारीरिक व्यायाम केल्याने हाडे. स्नायू आणि सांधे मजबूत बनण्यास आणि त्यांचा मजबुतपणा टिकुन राहण्यास मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.