मुंबई : मुळव्याधीमुळे अनेक जण त्रासलेले असतात. मात्र मूळव्याधीचा समूळ नायनाट होऊ शकतो, आणि हा उपाय सर्वात साधा, सोपा आणि स्वस्त आहे. फक्त तो समजून घ्या आणि आहारात त्याचा समावेश करा.
मुळव्याधीचा नायनाट करण्यासाठी तुमच्या आहारात सुरणाचा समावेश करा. सुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी असतो.
सुरणाचा कंद जमिनीत असतो म्हणून त्याला हिंदीत ‘जमीकंद’ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एलिफंट फूट याम. संस्कृतमध्ये सुरणाला अशोघ्न, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक इ. नावे आहेत. अर्श म्हणजे मूळव्याध. तो मूळव्याधीचा नायनाट करतो म्हणून त्याला ‘अशोघ्न’ म्हणतात.
कण्दू म्हणजे खाज. सुरण चिरताना हाताला खाज येते किंवा चिंच न घालता त्याची भाजी केली तसा घसा खवखवतो, म्हणून तो ‘कण्डूल’ त्याला चित्रदण्डकही म्हणतात. कारण त्याचा दांडा हिरवा असतो आणि त्यावर फिकट पांढरे ठिपके असतात.
तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे. सुरण, अरुची, अग्निमांघ, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लीहेचे विकार यावर गुणकारी आहे. संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते. आतडय़ांच्या तक्रारीवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. त्याच्या औषधी गुणांमुळे भावप्रकाशात म्हटले आहे.
म्हणजे सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे. रताळी, काटेकणगी, करांदे, अरवी, कोनफळ, बटाटा इ. अनेक भाज्यांसाठी उपयुक्त असलेले कंद आहेत. त्यात औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे म्हणून तो ‘कन्दनायक’.
सुरणाचे वन्यसुरण आणि ग्राम्यसुरण असे दोन प्रकार आहेत. ग्राम्य म्हणजे गावठी. या सुरणाची लागवड करावी लागते. वन्य म्हणजे जंगली. हा सुरण जंगलात आपोआप वाढतो. जंगली सुरण औषधासाठी -भेषजार्थ आणि गावठी सुरण खाण्यासाठी -भोजनार्थ- वापरतात.
सुरणात कॅल्शियम ऑक्झलेट असल्याने खाज येते. जंगली सुरणात त्याचे प्रमाण जास्त तर गावठी सुरणात कमी. सुरणाचा खाजरेपणा घालवण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात. परंतु जंगली सुरण पुष्कळ वेळा उकळावा लागतो.
सुरणाच्या कंदापासून जसे फूल येते, तसाच सुरणाच्या कांदय़ापासून पांढरे धब्बे आणि पांढरे ठिपके असलेला दांडा वर येतो. त्यानंतर तो दोन किंवा तीन भागांत विभक्त होतो. त्यांना पाने येतात. वरून पाहिले असता त्याचा आकार छत्रीसारखा दिसतो.
सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वाचा आहारात वापर करतात. काहीही वज्र्य नाही. सुरणाच्या पानांची कांदी चण्याची डाळ आणि खोबरे घालून भाजी करतात. सुरणाच्या कंदाचे सर्व गुणधर्म या पालेभाजीतही आहेत. ही भाजी खाल्ल्याने पोटही साफ होते.
पदेशास्त्रींच्या ‘वनस्पती गुणादर्श’ या पुस्तकात सुरणाच्या दांडय़ाची जून झाल्यावर भाजी करतात असे सांगितले आहे. सुरणाच्या फुलाची मटणात जो गरम मसाला वापरतात तो घालून जाडसर आमटी करतात, तर सुरणाच्या कंदाची बटाटय़ासारखी उकडून भाजी करतात.
तुपात हिरव्या मिरच्या जिरे फोडणीला घालून उपवासाची भाजी करतात तसेच गरम किंवा गोडा मसाला घालून रसभाजी करतात. पण फूल, कंद, पाने, दांडे काहीही असो चिंच किंवा आमसूल आवश्यकच.
आदिम अवस्थेत माणूस शिकार आणि कंदमुळे यावरच उपजीविका करीत होता. पुढे शेतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि कंदमुळांचे महत्त्व कमी झाले. पुढे कंदमुळे म्हणजे गरिबांचे अन्न असे समीकरण निर्माण झाले. विशेषत: सणासुदीला म्हणजे ऋषिपंचमीला कंदनायकाचे म्हणजे सुरणाचे औषधी गुणधर्म लक्षात ठेवून त्याचा आहारात वापर करावा.