बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

Updated: Aug 9, 2012, 04:04 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय. महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी या आंदोलनाचा श्रीगणेशा केलाय.

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर योगगुरु बाबा रामदेव आजपासून दिल्लीतल्या रामलीला मैदानावर उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. तत्पूर्वी बाबा रामदेवांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. बाबा रामदेवांच्या समर्थकांनी रामलीला मैदानावर आंदोलनाची जय्यत तयारी केलीये. दुसरीकडे यापूर्वीच बाबा रामदेवांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे अण्णा हजारे आता बाबांच्या आंदोलनावर काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजकीय पक्षाची घोषणा करणारे अण्णा बाबांच्या उपोषणस्थळी येणार का? याकडे आता राजकीय धुरिणांच्याही नजरा लागल्यात. काळ्या पैशाच्या मुद्यांबरोबरच सक्षम लोकपाल, घटनात्मक नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता तसंच सीबीआयला स्वायत्तता याही मागण्या केल्या आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यातही बाबा रामदेव यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावलं होतं. यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये रामदेव समर्थक आंदोलक महिलेचा मृत्यू झाला होता. रामदेवांना 30 ऑगस्टपर्यंत मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलीये. शिवाय काही अटीही आयोजकांवर घालण्यात आल्यात. बाबांनी मात्र बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे.