श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर बुरहान वनी याच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळलाय. ठिकठिकाणी सरकार, लष्कर आणि पोलिसांना संतप्त जमावानं लक्ष केलंय.
या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 96 पोलिसांसह 200हून अधिक जण जखमी झालेत. हल्लेखोर जमावानं पाच इमारती जाळून टाकल्यात यात तीन पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे.
कालपासून काश्मीर खो-यात संचारबंदी लागू करण्यात आलीये. खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 200 निमलष्करी दल पाठवणार असल्याची माहिती मिळतीये.
सुरक्षा दलांनी बुरहान वनीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर त्राल गावी त्याचा दफनविधी करण्यात आला.. यावेळी हजारो काश्मिरी तरुणांनी दफनविधीला गर्दी केली होती. दफनविधी दरम्यान या तरुणांनी आझाद काश्मीरच्या घोषणा दिल्या. त्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झालीये. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून आजही अमरनाथ यात्रा थांबवण्यात आलीये.