लष्करी अरेरावी; सहा जणांना चालत्या रेल्वेतून फेकलं!

भारतीय लष्करी जवानांची अरेरावी सहा तरुणांच्या जीवावर बेतलीय. चुकून सैन्यासाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात चढलेल्या या सहा जणांना लष्करी जवानांनी धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. मंगळवारी लखनौमध्ये ही घटना घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2013, 12:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनौ
भारतीय लष्करी जवानांची अरेरावी सहा तरुणांच्या जीवावर बेतलीय. चुकून सैन्यासाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात चढलेल्या या सहा जणांना लष्करी जवानांनी धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. मंगळवारी लखनौमध्ये ही घटना घडलीय.
अवध आसाम एक्सप्रेस मोरादाबाद स्थानकावर आली... पण इम्तियाज अली, गुडुडू, रऊफ, पंकज, पटवाई व रवी या सहा जणांना गाडी पकडण्यास उशीर झाला... गर्दीमुळे आणि घाईगडबडीत सगळ्यांनी समोर असलेल्या डब्यात चढणं योग्य समजलं. कसाबासा त्यांनी तो डबा पकडला पण हा डबा सैन्य दलासाठी राखीव असल्याचं त्यांच्या नंतर लक्षात आलं. पण एव्हानं गाडीनं स्टेशन सोडलं होतं. त्यामुळे उतरणं शक्य नव्हतं.
पण या सहा जणांना पाहून गाडीत अगोदरपासूनच बसललेल्या लष्करी जवानांनी हरकत घेतली. ही अरेरावी एव्हढी वाढली की या सहाही जणांना जवानांनी एकामागून एक चालत्या गाडीतून खाली फेकलं, असं जखमी तरुणांनी सांगितलंय. या सहा प्रवाशांपैकी पाच तरुणांना किरकोळ जखम झाली आहे तर एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय.

या तरुणांना गाडीतून खाली फेकलेल्या लष्करी जवानांवर अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेनंतर जखमी तरुण एवढे भेदरले आहेत, की या जवानांविरुद्ध काही कारवाई झाली तर आपण आणखी अडचणीत येऊ, अशी धास्तीच त्यांनी घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.