नवी दिल्ली : तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. लवकरच सरकारी बँकामध्ये नोकरीसाठी मेगाभरती होणार आहे. देशातील सर्व सरकारी बँकांमध्ये ६० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
सरकारी बँकामध्ये अनेक पदे रिक्त आहेत तसेच तब्बल ३८ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ही भरती केली जाणार असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
२०१३-१४ मध्ये रिक्त पदांची संख्या ३८ हजार २५४ होती. तर त्यावर्षी ३५ हजार ५४९ पदांवर भरती करण्यात आली. २०१४-१५ मध्ये रिक्त पदे ३८ हजार १७० होती तर या जागांवर ३० हजार ३५९ जणांची भरती करण्यात आली. २०१५-१६ मध्ये २१ हजार ५०० रिक्त पदे होती. या वर्षी एकूण २४ हजार १३३ पदावर भरती झाल्याचे सिन्हा म्हणाले.