www.24taas.com , झी मीडिया, अयोध्या
विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेली परिक्रमा यात्रा आज रोखल्या, उद्यापासून देशभरात आंदोलन करण्याचा,इशारा विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी दिलाय. तर प्रवीण तोगडिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळं अयोध्येत आज पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे.
विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या 84 कोसी यात्रेला आजपासून सुरुवात होतेय. या यात्रेला उत्तर प्रदेश सरकारनं रेड सिग्नल दिलाय. मात्र विश्व हिंदू परिषद यात्रेवर ठाम आहे.
विहिंप नेते अशोक सिंघल यात्रेसाठी अयोध्येकडे रवाना झालेत.
ही यात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जवळपास ३०० विहिंप नेत्यांना अटक करण्यात आलीय. काहीजणांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप विहिंप नेत्यांनी केलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेशात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.
जातीय सलोखा बिघडण्याच्या कारणावरून राज्य सरकारनं 84-कोसी परिक्रमा यात्रेला परवानगी नाकारल्यानं प्रशासकीय पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची खबरदारी घेतली जात आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिराच्या उभारणीसाठी विहिंपनं 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान परिक्रमा यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. फैजाबादसह बस्ती, बाराबंकी, गोंडा, बहरैच आणि आंबेडकरनगर या सहा जिल्ह्यांतून यात्रा प्रवास करणार असल्याची घोषणा ‘विहिंप’नं केलेली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.