मुंबई : ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याच्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयाने केलेल्या घटनांची सध्या बरीच चर्चा होतेय. शनिवारीही अशीच एक घटना घडली.
झारखंडमधील एका वडिलांनी रेल्वेमंत्र्यांना आपली अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकारासोबत पळून गेली आहे आणि आपल्याला मदतीची गरज असल्याचे ट्विट केले होते.
यावर रेल्वेमंत्रालयाने त्यांना प्रतिसाद देत लगेच मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. ही मुलगी आणि तिचा अल्पवयीन प्रियकर गीतांजली एक्सप्रेसमध्ये चढून मुंबईला येण्याच्या बेतात असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांनी ट्विटरद्वारे दिली होती. त्याचसोबत आपल्या मुलीचे फोटो आणि इतर काही माहिती दिली होती.
मंत्रालयाने ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली. नाशिकजवळ जवानांनी पळून जाणाऱ्या या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांना संपर्क केला.
यापूर्वीही रेल्वेमंत्रालयाने एका ट्विटवर प्रवाशांना औषधे, वैद्यकीय मदत, लहान मुलांना खाऊ, एका लहान बाळाला डायपर उपलब्ध करुन दिल्याच्या घटना घडल्यात.