आरूषी-हेमराजचा खून तिच्या पित्यानेच केला

आरुषी तलवार हत्‍याप्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. आरुषी आणि घरचा नोकर हेमराज यांना आक्षेपार्ह अवस्‍थेत पाहिल्‍यानंतर राजेश तलवार यांनी दोघांची हत्‍या केली.

Updated: Apr 24, 2013, 05:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आरुषी तलवार हत्‍याप्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. आरुषी आणि घरचा नोकर हेमराज यांना आक्षेपार्ह अवस्‍थेत पाहिल्‍यानंतर राजेश तलवार यांनी दोघांची हत्‍या केली, असा दावा सीबीआयने केला आहे. आरुषी आणि हेमराज यांना अशा अवस्‍थेत पाहिल्‍यानंतर राजेश तलवार यांनी गोल्‍फ स्‍टीकने प्रहार करुन दोघांना ठार केले आणि रात्रीतूनच पुरावे नष्‍ट केले, असे कौल यांनी सांगितले.
कौल यांनी साक्ष देताना सांगितले की, 15 मे 2008 ला आरुषीचा मृतदेह तिच्‍या खोलीत आढळला होता. तर दुस-या दिवशी हेमराजचा मृतदेह घराच्‍या छतावर सापडला होता. त्‍यापूर्वी रात्रीच दोघांची हत्‍या करण्‍यात आली होती. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास राजेश तलवार यांना काही आवाज ऐकू आले. त्‍यावरुन त्‍यांनी अंदाजा बांधला की काय सुरु आहे.
ते आधी हेमराजच्‍या खोलीत गेले. तिथे कोणीही नव्‍हते. तिथून त्‍यांनी गोल्‍फ स्‍टीक घेतली आणि आरुषीच्‍या खोलीत गेले. दरवाजा बंद नव्‍हता. हळूच दार उघडल्‍यावर दोघेही त्‍यांना आक्षेपार्ह अवस्‍थेत आढळले. ते पाहून राजेश तलवार यांचा संताप अनावर झाला आणि त्‍यांनी सर्वप्रथम हेमराजच्‍या डोक्‍यावर वार केला. त्‍यानंतर आरुषीच्‍या कपाळावर प्रहार केला. त्‍यामुळे दोघांचाही मृत्‍यू झाला.