www.24taas.com, झी मीडिया, कारगील
पाकिस्तान नावाचा साप नेहमी उलटून हल्ला करतो. तसेच आजही झाले आहे. पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कारगील, द्रास आणि काकसरमधील टेकड्यांवर तुफान गोळीबार केला. पाक सैन्याने स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. याआधी पाकने १९९९ मध्ये कारगीलमध्ये मोठी घुसखोरी केली होती. वाजपेयी सरकारने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नवाझ शरिफ सरकारला माघार घ्यावी लागली होती.
लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकने गुरुवारी रात्री उशिरा द्रासमधील डोंगररांगावर गोळीबार सुरू केला. हा हल्ला सुरू असतानाच पाकिस्तानी सैन्याने अन्य अनेक डोंगरांवरील भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. भारतीय सैन्याने पाकच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.
उंच टेकड्यांवर असलेले पाकिस्तानी सैनिक लडाखमधून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर थोड्या-थोड्या वेळाने सतत गोळीबार करत आहेत. अशाच स्वरुपाचा गोळीबार १९९९ मध्येही झाला होता. या गोळीबाराचे स्वरुप पाहूनच लेफ्टनंट सौरभ कालिया आणि त्यांचे सहकारी टेहळणी करण्यासाठी गेले. घुसखोर पाकिस्तानी सैन्याने त्यांना घेराव घालून पकडले. मानवाधिकरांचे तसेच आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करुन पाक सैन्याने कालिया आणि त्यांच्या सहका-यांना हाल-हाल करुन मारले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.