पोलिसांनी गँगस्टर समजून अकाली दलाच्या नेत्याचा केला एन्काऊंटर

गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्यानं वाद निर्माण झाला झाला आहे. साध्या वेशात आलेल्या पोलिसांवर या नेत्यानं पिस्तूल रोखलं आणि यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घोडचूक लक्षात येताच पोलीस घटनास्थळावरुन पसार झालेत. 

Updated: Jun 17, 2015, 12:37 PM IST
पोलिसांनी गँगस्टर समजून अकाली दलाच्या नेत्याचा केला एन्काऊंटर title=

अमृतसर: गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्यानं वाद निर्माण झाला झाला आहे. साध्या वेशात आलेल्या पोलिसांवर या नेत्यानं पिस्तूल रोखलं आणि यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घोडचूक लक्षात येताच पोलीस घटनास्थळावरुन पसार झालेत. 

अमृतसर इथं काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांची तस्करी करणारा सोनू कांगला या आरोपीला गँगस्टर जसदीप सिंग उर्फ जग्गूनं पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्यात मदत केली होती. तेव्हापासून अमृतसर पोलिसांची अंमलीपदार्थ विरोधी शाखा जग्गूच्या शोधात आहे. मंगळवारी संध्याकाळी जग्गू त्याच्या आय २० या कारमधून वेरका इथं फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांचं पथक वेरकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून बसले होते. 

याच दरम्यान आय २० या कारमधून अकाली दलाचे नेते मुखजित सिंग मुक्खा हेदेखील वेरकाच्या दिशेनं जात होते. आय २० कारमध्ये जग्गूच आहे या गैरसमजूतीतून पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत गाडीला थांबवलं. दुसरीकडे मुक्खा यांची काही जणांशी पूर्ववैमनस्य असून याच वादातून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घरावर गोळीबारही झाला होता. साध्या वेशात गाडीला गराडा घालून उभे असलेले पोलीस हे विरोधी गटाचे गुंड आहेत, असं मुक्खा यांना वाटलं. 

त्यांनीदेखील स्वतःकडील पिस्तूल पोलिसांवर रोखली. मुक्खा यांनी पिस्तूल बाहेर काढताच पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि या गोळीबारात मुक्खा यांचा मृत्यू झाला. 

आय २० गाडीत जग्गू नसून अकाली दलाचे नेते मुक्खा असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तिथून पळ काढला. मुक्खा यांच्या गाडीवर नंबर प्लेट नसल्यानं पोलिसांचा गोंधळ झाला आणि पहिली गोळी मुक्खा यांच्याकडूनच झाडण्यात आली असा दावा पोलिसांनी केला आहे. 

तर चूक लक्षात आल्यावर पोलिसांनी गाडीची नंबर प्लेट काढून घेतली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अमृतसर पोलिसांच्या या निष्काळजीपणाविरोधात अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.